पत्रांक ८५.
स. १७६५ ता. २६ मे श्री शंकर. १६८७ ज्येष्ठ शुद्ध ६
राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसिः-
२सु।। खमस. हकीमजीकडील पत्र आलें. त्यांत लिहीलें होतें कीं मुरादखान३ व त्याचे बंधु कैद केले. सरदारखान वगैरे आवरंगाबादेत कैद केले. आद्यापि धोंडो१ रामाचें लिहीलें आलें नाहीं. परंतु बहुधा मागाहून लिहिलें पोहचेल. हे गोष्ट बहुत वाईट जाहाली. याची तोड कसी करावी, तो विचार बहुत लांब केला पाहिजे. बहुतकरून भासतें कीं आम्हांसी बिगाड करावा ऐसा डौल मोगलाचा आहे. सबब खानास कैद केले. त्याकडे २आणके-टणके किले आहेत. त्याची तजवीज कसी करावी ? बहुतच लांब३ विचार केले पाहिजेत. भोंसले लबाडकी करावयास चुकावयाचे नव्हेत. येविसी लांब विचार पाहिजेत. भोसले, मोगल, हैदर, जाधव च्यार येके जागा जाहले. तेव्हां इतक्यांसी साद४ बांधणें दुरापास्त आहे. खजानपूर५ आहों तें कळतच आहे. सालमजकुरीं आमचें वर्षप्रवेशकाळीं लग्नीं गुरु६-शुक दोन्ही साहावे पडले आहेत, ते दोघेहि चैन पडों देणार नाहींत. अबरु बचतां संकटच दिसतें. परंतु एक ईश्वरकृपा आहे, तरी कांहीं भीत नाहीं. गुरु-शुकहि अनुकूळ होतील. असो. हा दैवी विचार आहे. परंतु मानवी विचार कसा करावा याची योजना बहुत लांब विचार करून करावी. तोडीवर तोडीवर बोलाव्या. पुढें कसें करावें तें सारें योजावें. मजला तरी पुढील चिन्ह बरें दिसत नाहीं. मानवी विचारावरूनहि फटकाळ दिसतें. दैवी म्हणावा तरी गुरु-शुक्र दोन्ही प्रबळ ग्रह षष्ट-स्थानीं सालमजकुरी आहेत. हे ब्राह्मणशत्रूचा व दैत्यशत्रूचा दोघाचाहि उत्कर्ष करावयास चुकणार नाहीं (त.) त्याजवरून परम विचारांत पडलों आहों. ईश्वरकृपा आहे हें तरी खरेंच. परंतु ईश्वराजवळ आम्हांस त्याचे कृपेखेरीज दुसरी यांच्या (याञ्चा) करणें नाहीं. जें तो आपले संतोषें करील तें करो. आमचा निश्चय हाच कीं, प्राण गेले तरी दुसारि यांच्या (याञ्चा ) न करावी. प्रसंगास आली म्हणोन गोष्टी तुह्मास खोलून लिहिली. असो. आमचें अंतर्यामीं तोच आहे, व आमचा निश्चय चालविणें हेंहि त्याचेच हातीं आहे. जसें करणें तसें करील. तूर्त प्रपंचरीतीनें उपायस आळस नच करावा. उपाय७ कोणता ह्मणाल तरी मोगलास परिच्छिन्न जास्ती कांहीं कबूल करून, बहुत आशेस लावून, फौज, तोफा कुमकेस आणावाव्या. मुरादखान कैदच जाहला असिला तरी निंबाळकर व खंडागळे, खंदारकर ऐसे आणवावे. कांहीं तोफा आणवाव्या. निदानीं *देवदुर्गहि देऊं करावें. जाधवराव देखील पंचवस तीस चाळीसपर्यंतहि जागीर देऊ करावी. काबू पहावी तसें करावें. इतकेंहि द्यावयास पुरवलें. परंतु दोघे मोंगल व भोसले, जाधव ऐस येक करून मग लढाया घ्यावयास पुरवणार नाहीं. यास्तव चहूंकडे तर्तुदी कराव्या. मल्हाररावास वारंवार पत्रें ल्याहावीं. महादजी सिंद्यास समजाविसीचें पत्र ल्याहावें. चाकर आहे रुसोन गेला आहे. त्यास च्यार पत्रें समजाविसीचीं गेलियास दोष काय ? बहुत युक्तीनें गळ घालून ल्याहावी. आला तरी आला; न आला तरी पारपत्य श्रीकृपेंकरून होतच आहे. चिंता नाहीं. चिरंजीव १आबा येतीलच. पुरंदरचे जसें कळेल तसें च्यार रु॥ये हाताखाली आलियास बहुत उपयोगी. गंकारपूर्वकाचे२ राजकारण विना तेथें ताणल्यासिवाय गोडीस येणार नाहीं. वाचून, सविस्तर मनन करून, उत्तर कलमवार जलद पाठवणें. तुह्मीं व आबाजी माहादेव, चिंतो अनंत व त्रिंबक विनायक, ३चवघे बसोन माणसें बंगल्याखालीं घालऊन वाद-प्रतिवाद करून सिधांत करून उत्तर लिहिणें. व कागद चहूंकडे पत्रांचे पूर चालवणें. पत्रामागें पत्र व बातम्या ऐशा चालवणें. प्रयत्नास आळस तिळमात्र न करणें. केवळ हेच तपश्चर्या समजोन याच उद्योगांत राहाणें. गाई, ब्राह्मण, देव यांचें रक्षण करणें. हेंच४ तप. हाच जप. यामध्यें जें पुण्य लागेल तें च्यार माळा ओढल्यानें लागणार नाहीं. दिवसास निजत न जाणें. रात्रौ दीड प्रहर दोन प्रहर कारभार करणें. रवाना सोमवार. रुजु.