पत्रांक ८४.
१७६५ मे, जून श्री १६८७ ज्येष्ठ
ही दौलत मोठी. या दौलतेस सर्व लहान मोठ्यांनीं अनुकूळ असून जेणेंकरून दौलत नीट होय तेंच सर्वांनीं करावें; तें येकीकडे राहून दौलत दोहो जागा करावी हेच तीर्थस्वरूपाचें मानस. त्यास आम्हांस कांहीं करणें नाहीं. कारण कीं ही दौलत पहिल्यापासून एकांनींच करावी, वरकडाचा भार करणारावर असावा; याप्रमाणें चालत आलें असतां, आतां वडिलाचें मानस कीं 'आम्हास गुजराथ द्यावी. आणि सर्व किल्याचा बंदोबस्त आम्हीच करूं.' म्हणतात त्यास आम्हांस कांहीं करणें नाहीं. कांकीं अशानें ही दौलत चालणार नाहीं. व दोहों जागा दवलत जाल्यानें लवकीकहि वाईट, यास्तव सर्व वडिलांनीच करावें. आम्ही स्वस्थ भलते जागा राहूं. आपल्या आपल्यांत भांडून दौलत बुडविली हा लवकीक कशास १पहिजे ? सर्व त्यांनीच करावें हें फार चांगलें. आम्ही स्वस्त राहूं. वडिलांना नीट केल्यावर आम्हांस सांगतील तेव्हां आम्ही जवळच आहों. हेंच प्रस्तुत काळीं बरें. तुम्हांस लिहावयाचें कारण इतकेंच कीं सर्व लोक म्हणतात; 'ही दौलत थोर, तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेब चिंतोबाचे हातीं, तेव्हां चिंतोबांनीं वडिलांस समजून सांगावें, आणि या गोष्टीचा बंदोबस्त पाडावा.' हे येकीचकडे राहून नव्या गोष्टी निघतात हें काय ? तेव्हां या गोष्टीचा शब्द तुम्हांवर लोक आणतात. तुह्मी तर वडिलास आपल्यातर्फेनें सांगतच असाल. परंतु वडिलाचा इतबार तुम्हावर, तेव्हां शब्द तुम्हांवर आणितात. तुह्मी तर नीट करतां, परंतु लवकीक बाहेर कसा आहे हा तिराइतास पुसावा. ही चीटी वाचून फाडून टाकणें. दुस-यास एकंदर कळऊं न देणें. दुस-यास कळवाल तर शफत असे. हेंच बोलणें रुबरु बोलावेंसें होतें, परंतु वर्तमान ऐकिलें कीं तुम्हांस बरे वाटत नाहीं यास्तव चिठी लिहीली असे.