पत्रांक ८३.
१७६४ ता. ६ आगष्ट श्री १६८६ श्रावण शुद्ध ९
३राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि सेवक माधवराव बल्लाळ प्रधान नमस्कार. उपरी, येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणें विशेष. तुम्ही पत्र पाठविलें तें पावलें. पत्र लिहिलें कीं ‘आप्पाजी गणेशास ताकीद होऊन गोपाळ-रामचे हवालीं ठाणें हो तें करावे' म्हणून संशय धरून लिहिलेत व ‘तीर्थस्वरूप राजश्री दादासाहेबांचे मनांत संशय आला आहे.’ म्हणून लिहिलें तें कळलें. त्यास तुम्हीं वडिलांस विनंती करून आप्पाजी गणेशास ठाणे न द्यावयाविसी आम्हीं पत्रें लिहिलीं असतील तीं पत्रें खामखा आणवणें. वडिलांचे चित्तांत संशय आणणारे आणतात. येथें तरी वडिलांचे मर्जीशिवाय दुसरा अर्थच नाही. असें असतां लहान माणूस वडिलांचे चित्तांत विपर्यास आणून देतात. हें काय? हें पत्र वडिलांस विदित करणें. या मजकूराविसीं वडिलांची खातरजमा केलीच असेल. आम्हींच ल्याहावेंसें काय आहे? परंतु हें पत्र ल्याहावयाचें कारण हेंच कीं इकडील मजकूर सविस्तर तुम्हांस ठाऊक असतां चित्तांत संदेह आणून या गोष्टीचा अंदेशा न करितां पत्र लिहिलें याचें कारण कळलें नाहीं. परंतु असेंही वाटते कीं वडिलांचे मर्जीचा भाव पाहून पत्र लिहिलें असें वाटतें. पत्र संदेह धरून लिहिलें याचें कारण पत्र लिहून पाठवणें, जाणिजे. छ ७ सफर बहुत काय लिहिणें. तेथील वृत्त कळावें म्हणून लिहिलें तें कळलें. तुम्हांविसीं संदेह नाहीं. छ मजकूर पा। छ २४ सफर श्रावण मास सु।। खमस