पत्रांक ७९.
पाणीपतनंतर सर्व फांटाफूट झाली, त्यावेळीं दादासाहेबानीं आपल्या पक्षाकडच्या लोकांस वाटतील तशा जाहगिरी, इनामें दिली. पुढें राक्षसभुवनाची लढाई होऊन पुनः स्थिरस्थावर झाल्यावर रावसाहेब, बापु इत्यादिकांच्या आग्रहावरून सर्व जहागिरदार आपल्या जहागिरीची चौथाई देण्यास कबूल झाले. पण मल्हारराव सुभेदार कबूल नव्हते. तेव्हां त्यांस कायल करून त्यांचीं कबुली मिळवावी, एतदर्थ हें पत्र रावसाहेबांनी दादासाहेबांचे हितचिंतक रायरीकर यांस लिहिले आहे.
स. १७६४ ता. ९ एप्रील श्री १६८६ चैत्र शुद्ध ८
पु।। राजश्री चिंतो विठ्ठल गोसावी यांसि
उपरी. राजश्री मल्हारजी होळकर याणीं चौथाई सरंजाम सरकारांत द्यावा असा करारे वचन तीर्थस्वरूपांजवळ केलें असतां ‘आतां बैजापूर, रावेर मात्र देऊं' म्हणतात ही गोष्ट अपूर्व आहे. सर्वांनीं केल्या करारा प्रमाणें द्यावें आणि यांनीं कां न द्यावें? 'तुम्हीं करार केला आतां कां देत नाही? वचन तुम्हीं केलें ते कोठें राहिले?' असे त्यांच्या आंगीं लाऊन बोलल्यास ( काम ? ) होईसे आहे. तर तुम्हीं तीर्थ-रूपांस विनंती करून त्यास १कायल करून चौथाई सरंजाम करारा-प्रों सरकारांत येई. ती गोष्ट करणें. येविशीं तीर्थरूपास विनंती लिहिली आहे. तुम्हीं वरचेवर स्मरण देऊन कार्य करून घेणें. जाणिजे. छ १० सवाल सुहूर-सन अर्बा सितैन मया व अलफ. मल्हारबाचा प्रकार २प्रत्ययास आलाच आहे परंतु जेथवर निकड होईल तितके करणें, छ मा।*
पो छ ५ जिलकाद वैशाख मु।। त्र्यंबक