पत्रांक २५.
इ. स. १७६५ ता १८ सप्तंबर श्री. १६८७ आश्विन शुद्ध ३
राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसिः-
अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य स्ने।। माहादजी शिंदे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणेन स्वकीय कुशल लेखन करीत असलें पाहिजे. विशेष. आजपावेतों रा. गणोजी कदम व गोविंदराव महादेव व मोरो विठ्ठल यांचे मायेंत x x x मिळोन दरबारी खूळ केलें. श्रीमंतासी अनेक भास भासवून तुम्हांकडे श्रीमंताची मर्जी पूर्ण होती त्यांत अंतर पाडलें. यावरून तुम्ही रा।. अंताजी विश्वनाथ, राजश्री विष्णु महादेव याजवळ, ठेऊन नाशकास गेला. मागें श्रीमंतांनीं नवें मुद्दे घातलें कीं, ‘(१) दोन लक्षाचा सरंजाम सरंजामांतून द्यावा, व (२) सरदारास एकटे भेटीस आणावें,’ ऐसीयासि त्याजकडे एकही निश्चय जाहला नव्हता. जाबसाल मात्र उभयपक्षीं श्रीमंत करीत असतां तुम्हांकडे याज शिवाय नवा मुद्दा आणिक घातला कीं ‘सरंजाम शिंद्यांनीं तुम्हांस१ दिल्हा तो देखील सरकारांत द्यावा. व तीन लक्ष त्याजहून शिवाय माहादाजी गोविंद मृत्य पावले यामुळें द्यावे’ म्हणोन. ऐसियासि प्रस्तुत गणोजी कदम (व) गोविंदराव याकडून जाबसाल होईनासा पाहून विष्णु माहादेव याचें मायेंत शिरोन-श्रीमंताचे आज्ञेनरूप विष्णुपंत व अंताजीपंताकडून कबूल करवितात, म्हणोन वर्तमान ऐकिलें. त्यास त्या लबाडाच्या म्हटल्यानें सरंजाम कोण देतो ? पूर्वीपासून तुमच्या सल्याप्रमाणें पैकामात्र द्यावा. बनला तर माघे सरंजाम श्रीमंतांनी घेतला तो हस्तगत करावा. तेव्हां पुढें सरंजाम कसा देवतों ? आपण विचाराचे मागें पाहावें. गणोजी कदम यासीं सहसा आपण या जाबसालांत न घ्यावें. दरबारीं याचें पारपत्य यथास्तित होय तें करावें. दुसरें जें कोणी ऐसीं कर्मे दरबारीं करूं न पावें तें करावें आणि सरंजामाचा जाबसाल कबूल न करावा. दरबारचा रंग पाहून पैका मात्र कबूल कराल तो आह्मास मान्य असें. गणोजी कदम या खेरीज जो जाबसाल तुह्मी कराल तो आम्हास मान्य होईल. पत्राचें उत्तर सत्वर पाठवावें. रा. छ २ रबिलाखर *बहुत काय लि।। लोभ असो दिजे हे विनंती. (पौ) छ २७ माहे रबिलाखर सन सीत सितैन मु।। नाशिक.