पत्रांक २३.
इ. स. १७६५ ता. ३० आगष्ट. श्री. १६८७ भाद्रपद शुद्ध १५
राजश्री नारोपंत नाना गोसावी यांसिः—
अखंडितलक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ महादजी शिंदे दंडवत. विनंति उपारि. येथील कुशल ता। छ १२ रा।वल मुकाम नजीक बकाणे पा। हांडोती जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष. सांप्रत आपणाकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी सविस्तर लेखन करावें. यानंतर दरबारचे बंदोबस्ताविशीं पेशजी पांच सात पत्रें तुम्हांस पाठविलीं. त्यांस तुम्हीं एक दोन पत्रें पा।. तेथें लि॥ कीं ‘आम्ही सर्व बंदोबस्त करून घेतों. आपण कोणेविशीं चिंता न करावी’ म्हणोन ऐसियासि आम्हीं तों आपल्या लक्षावरी बेफिकीर आहों. तुम्हांखेरीज दुस-यासी बोलणेयाचा प्रकार किमपि नाहीं. असे असोन अद्यापि आपणाकडून कांहींच बंदोबस्ताचा प्रकार दिसोन येत नाहीं, अथवा पत्रहि येऊन वर्तमान कळत नाहीं. यावरून अपूर्व आहे. या उपरि तरी बंदोबस्ताचा विचार काय केला हें सविस्तर ल्याहावें. आपण जे करतील ते आम्हांस मान्य असे. आपले मनोदयानरूप बंदोबस्त होऊन चार रुपयेचे वरी जाबसाल ठरला तरी आपण मान्य करून लेहून पाठवावें. तूर्त पांच लक्ष पावेतों हुंड्या आपणाकडे पाठवून देऊं. भरंवसा आपला असे. गणोजी कदम तेथें कितेकप्रकारें घालमेल करीत आहेत. तुम्हांसहि भलतेंच समजावितील. तर आपण त्याचे मनास न आणावें. जें करणें तें आपले विचारें करावें. ते आम्हांस मान्य असे. वरकड कितेक राजश्री बाजी नरसिंह यांचे पत्रावरून कळेल. बहुत काय लि।। ? हे विनंति.