पत्रांक २१.
इ. स. १७६५ ता. १३ जुलै श्री. १६८७ आषाढ वद्य ११.
राजश्री नारोपंत नाना गोसावी यासः—
अखंडितलक्ष्मीआलंकृत राजमान्य स्ने।। माहादजी सिंदे दंडवत कृ. विनंती उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. विशेष. इकडील वर्तमान पूर्वी दोन चार पत्रीं आपणांस लि।। आहे त्यावरून कळलेंच असेल. सांप्रत मुकुंदवारीनजीक कोटें येथें मुकाम आहे. काटेकराकडील वकील येऊन भेटले. आठा चौ रोजांत येथील मामलतीचा फडशा करून पुढेंहि हिंदुस्थान प्रांते जाणार. आपण प्रसंगीं आहेत. दरवारचा बंदोबस्त करून सनदा वस्त्रें पाठवावीं. राजश्री
विष्णु महादेव यांणीं लि।। होतें कीं, ‘साहा लक्षपर्यंत नाना आम्हीं बोलोन करारांत आणिलें आहे म्हणोन’ ऐसियासी येथील वोढीचा१ प्रकार आहे हें आपणास ठाऊकच आहे. तशांत श्रीमंताची मर्जी रक्षून जें आपलें व विष्णुपंताचे विचारें येईल त्याप्रमाणें मान्य करून देऊन सनदावस्त्रें घेऊन विष्णुपंतास आम्हाकडे पाठवावें. जो ऐवज आपण तेथें देतील तो आम्हीं देऊं. वरकड कितेक घराऊ व + + + + वर्तमान राजश्री अच्युतराव२ याणीं लिहिलें आहे, त्यावरून सविस्तर कळेल. सारांश तेथील बंदोबस्त आपले हातें करून घ्यावा, येथील बहु-नाइकीचा३ प्रकार आहे. दुईमुळें भलताच खुळ करावयासी उभा राहतो ! ऐसियासी आपण दरबारचा बंदोबस्त पक्काकरून घ्यावा. सारांश आमच्या सरदारीचे स्वरूप व तुमचे दिवाण गिरीचे४स्वरूप राखोन येथास्थित चाले तें करावें. वरकड कितेक राजश्री मोरो कृष्ण पाठविले आहेत हें सांगतां सविस्तर कळेल. छ २४ मोहरम* बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
