श्रीवरद.
लेखांक १५.
१७०३ ज्येष्ठ शुद्ध ६.
पु॥ श्रीमंत राजश्री नाना स्वामीचे सेवेसी :-
विनंतिपत्र आज्ञा कीं :- गाडर वसईहून मगरूरीनें दहा बारा पलटणें, कवाइती, हजार गोरा, वीस पस्तीस तोफा या सरंजामानिसी घाट चढून वर आला. त्याचे मुकाबिल्यास राजश्री हरिपंत व तुकोजी होळकर व परशरामपंत वगैरे फौज व सरंजामानिसी होते. त्यास, इंग्रजांस मयदानांत काढून सजा करावी ही तजवीज होती. परंतु सरकारी फौजेचे लढार्सचे मुकाबिल्यामुळे मैदानांत यावयाची जुर्रत न करतां घाटमाथां अडचणीच्या जागा पाहून राहिला. तेव्हा राजश्री परशरामपंत यांस फौजेसुद्धां घाटाखालीं इंग्रजांची रसद बंद करून महासरा द्यावयाकरितां पाठविले. त्यास, परशरामपंत याणी इंग्रजी रसद येत होती त्यास महासरा करून, सातआठ हजार बैल गल्ल्याचे कुल लुटून आणिलें व कित्येक इंग्रजी लोक यांस तंबी करून गारत केले. याजउपरी पनवेलीहून पांच सहा पलटणें, आठ दहा तोफा, ऐसे सरंजामसुद्धां घाटरुखें गाडर याचे कुमकेस येतात, ही बातमी सरकारची आली. त्यावरून राजश्री हरिपंत यास वमय हुजुरात फौज, तोफा व गारदी घाटावर गाडराचे मुकाबिल्यास येऊन तुकोजी होळकर यांस वमय फौज सरंजाम घाटाखाले पाठविलें. त्यास तुकोजी होळकर व परशरामपंत याणी पनवेलहून पलटणें येत होती त्यांस महासरा देऊन लढाई दिल्ही. होळकर यांणी शुतरनाळांची व करोलची मारगिरी दिल्ही व लढाई चांगली जाहली. इंग्रजांकडील कवायती लोक व गोरे पांच सहासे ठार, सिवाय जखमी जाहले. सरकारचे लोकही फार कामास आले. सेवटी पलटणें झाडीचा आश्रय करून बहुत मुशकिलेनें गाडर याजपाशी जाऊन पोहोचली. त्या दोहों दिवसांत हरिपंत याणींही घाटावरून निकड करून गाडरासी मुकाबिला केला. दुतर्फा लढाईची निकड बहुत जाली. रसद बिलकुल पोहोंचेना. तेव्हा बेताबा होऊन छ २३ रबिलाखर रात्रौ घाट उतरून + + + + + + + फौजसुद्धां घाटाखाली गेले. येकीकडून हरिपंत याप्रमाणें व येकीकडून होळकर व परशरामपंत याप्रमाणे इंग्रजांसी दुतर्फा घेरून, दोन तीन लढाया निकडीच्या जाहाल्या. तोफा व बाणाची मारगिरी जाली. लोकांनीही घोडे घालून लगट फार केली. याजमुळे इंग्रज बहुत घाबरा जाहला. येक तोफ व बंदुका व दारूगोळ्याचे संदूक व छकडे, रथ वगैरे सरंजाम बेशुकर पाडाऊ आला. मिस्तर पारकल नामे गाडराचे बराबरीचा सरदार लढाऊ व तरतूदकार होता तो गोळीची जखम लागून जायां जाला. गोरे व कवायती लोक मिळोन सात आठसें पडले. सिवाय जखमीही बहुताद आहेत. सरकारचीही घोडी व लोक बहुत कामास आले. शेवटी गाडर ज्यान बच्याऊन पळाला. थोडका आसबाब पनवेलीदऱ्याने आसरियास जाऊन पोहोंचला. सरकारच्या फौजाही पनवेलीजवळ मुक्काम करून आहेत. तुह्मास कळावे ह्मणून लिहिले असे. बादशहा व नबाब नजबखान यांसही कळवावें. इंग्रजांची शिकस्त श्रीमंताचे प्रतापेकरून मोठी जाली व त्याचा नाशही फार जाला, ह्मणोन लि॥. त्यास आज्ञेप्रमाणे या पत्राची फारसी करून पातशहास व नवाब नजबखानास सविस्तर मार समजाविला. वाचून बहुत संतोष पाऊन उत्तर केले कीं, र्इश्वर हमेश त्याप्रोंच श्रीमंताची फत्ते करो व इंग्रजांचा कदम पातशाहींतून निघून लयाते पावो. ह्मणून आशीर्वाद ममतापूर्वक देऊन नजबखानास आज्ञा केली की, तुह्मीही काही उद्योग कराल किंवा नाहीं ? नजबखान याणी अर्ज केला की, तोफखाना वगैरे सर्व तयारी आहे, कुंजपुरीयाकडील फौज रिकामी जाली ह्मणजे सर्व गोष्टी मर्जीनुरूप घडण्यांत येतील. याप्रमाणे बोलिले. पुढे आमलांत येईल ते मागाहून विनंति लिहूं. इंग्रजांचा नि:पात करणियाची तदबीज नबाब बहादूर विशेषच सांगतात. परंतु स्वामीचे प्रत्ययास येऊन आह्माकडून लिहविले व यांनी सेवेसी लिहिले ते खरे होय तो सुदिन ! कृपा केली पाहिजे. हे विनंति.