श्री.
लेखांक ३०२.
१७०५ ज्येष्ठ वद्य १४.
विद्यार्थी सदाशिव भगवंत सां।। दंडवत विनंति त॥ ज्येष्ठ व॥ १४ रविवार पावेतों मु॥ सातारा येथें असों विशेष येथील वर्तमान पेशजी लिहिलेंच होतें त्याचें उत्तर आलें नाहीं तेथून ग्रहस्त आले त्याणी मात्र पत्रांतील भाव खुणेचे सांगितल्यावरून कळले येथील वर्तमान तरी श्रीमंताचा काल होतांच दुसरे दिवशीं भिंती मोकळ्या जाल्या त्याजवर राजश्री त्रिंबकराव आलियावर विचार होऊन मातुश्री सखाबाई यांस पुण्यास न्यावी हा आग्रह पडोन सखाबाईंनीं एक उपोषण केलें ते वेळे धोंडो गणेश व नारो भगवंत याणीं फडनिसाचे कानावर घालोन इत्यर्थ ठराविला कीं, श्रीमंत तात्या याणी हळोंच हाती धरून खोलीत घालावी ही ही बातमी कळलियावर तो विचार राहिला फडनिसांचा आग्रह वस्त्रें देण्याचा आहेच परंतु बाबूराव याणीं तें काम परवानगीचा उजूर करून उभयतानी ही पत्रें पाठविलीं आहेत ते परवानगी आठ दिवसांत आणून देणार राजश्री परशराम पंतभाऊ यांस लिहिलें आहे. लोणीस यांचे व्याही चिंतोपंत लिमये आहेत त्यांस पत्रें पाठविली आहेत ते भाऊंजवळ रदबदली करून पत्र घेणार याजकरितां आपण त्वरा करून त्यांचे कानावर घालावें की वाटणी होऊन फारखित जाली असतां बळेंच घरांत शिरोन त्याचे स्त्रीस अटक केली आहे याजकरितां दहा हजार रुपये नजर घेऊन सरकारांतून दत्तपुत्र घ्यावयाची परवानगी देऊन पदाची वस्त्रें द्यावीं ह्याजप्रमाणें बोलोन वस्त्रास अडथळा पडे ते केलें पाहिजे आह्मीं घरास जाण्यास निरोप मागत होतों त्यास फडनिसाकडून अडथळा करून राहवलें आतां पळोन यावें या विचारायंत आहों यावयास च्यार दिवस अधिक उणे लागतील याजकरितां पत्र पावतांच वस्त्रास अडथळा पडें तें करावें चिदरावर जमिनीची चिठी आपणास दिल्ही याजमुळें फडनिसास फारच विषाद आला आहे भेटीनंतर सविस्तर कळेल तात्यांचें पत्र आपलयस शिवाजीबराबर आहे तें दस्ताऐवजीच आहे जिजीबाई एत असतां येऊ दिल्ही नाहींत ऐसें आहे तें दाखऊन वस्त्रास अडथळा पडे तें करावे आह्मीं तूर्त कारागृहातच आहों पुढे त्रिंबकरायास बाह्यात्कारें करावें पत्र मागील व हे वाचून फाडून टाकावे सविस्तर राजश्री गणपतराव वैद्य सांगतां कळेल त्यास विचारावें हे विनंति.