श्री.
लेखांक २१३.
१७०० माघ शुद्ध ८.
राजमान्य राजश्री सदासिव धोंडदेव यांसि :-
सु॥ तिसा सबैन मया व अलफ. अनुष्ठानाचे ब्राह्मणांस दक्षणा देऊन निरोप देऊं, ह्मणोन पेशजी तुह्मांस आज्ञा केली आहे. त्यास, हालीं तेथील दरमाहाचे नेमणुकीचे खर्चाची याद अलाहिदा पाठविली आहे, त्याप्रों।। खर्च करीत जाणें. जाजती खर्च असेल तो तोडसरे, तुह्मीं व त्रिंबक पांडुरंग तेथें राहाणें. भास्कर भिमाजी यास हुजूर पाठवून देणें. बेलापूर व कल्याण व पक्षवेल येथें सरकाराच्या तोफा व बंदुका व दारूगोळा वगैरे जिन्नस असेल तो तुह्मांकडे पोचविणें ह्मणोन ठाणेदारास ताकीदपत्रें पाठविलीं आहेत. व याच कामाकरिता आबाजी साबाजी कारकून पाठविले आहेत. हे सरंजाम घेऊन तुह्माजवळ येतील त्यापैकीं तोफा वगैरे जो जिन्नस फरोख्त होईल तो करणें. फरोख्त न होय तो माफजतीनें सरकारच्या वाड्यांत नेऊन ठेवणें. जाणिजे. छ ६ मोहरम. आज्ञा प्रमाण. तुह्मीं व त्रिंबक पांडुरंग मिळोन जनराल कोशालासी बोलत जाणें. खर्च तोडणें जरूर. खर्चाची यादी पाठविली त्याप्रमाणें करणें. वाड्याची व देवाची व वरलचे बागाची तितक्यांतच निगेवानी करणें. जातीनें मेहनत करीत जाणें. विश्वनाथ नारायण आपले इतबारियांत आहेत. ते व तुह्मीं उभयतां मिळोन काम तेथील चालवणें. वरकड आबाजी साबाजी व ब्रह्मणजी पारसी याचे जबानीवरून कळेल.
(लेखनावधि:)