मेस्तर शहानें मुंबईचे कोसलदारांची व जनरालाचे मर्जीची माहितगिरी सांगितली. प्रस्तुतची गोष्ट बंगालियांतूनच जाली आहे. मुंबईवाल्यांस अभिमान पडला आहे. ते श्रीमंताचा हात धरिला तो सोडणार नाहीं व दिलगीरही आहे. कारण दुसरा जनराल विलायतेहून रवाना केला तो महिन्या पंधरा दिवसांत मुंबईस पोहोंचेल. तेव्हां श्रीमंतांकडून जो लाभ होणें तो नव्या जनरालास होईल, आपल्यास कांही नाहीं ह्मणोन दिलगीर आहे. सारांश, आपलें काम विलायतेशिवाय होणार नाही. खुषकीचे वाटेनें कोणी शहाणा माणूस पाठविल्यास आठ दहा महिन्यांत बंदोबस्त पक्का होऊन येईल. याप्रमाणें सांगितलें. त्यांचे मान जावयाचें दिसतें. स्पष्ट बोलोन दाखवीत नाहींत. परंतु यास पाठवावयास सला ठीक नसे. याविसीं बापू सारस्वतासीं बोलिलो आहे. हा निवेदन करील. १
पु॥ सेवेसी विज्ञापना. मेस्तर माष्टीन व मेस्तर फ्लेचर उभयतां आमचे बिराडास बुधवारी सायंकाळी येऊन सांगितलें कीं, श्रीमंतास लिहिणें कीं, कोणेविसी फिकीर न करावी. मेस्तर माष्टीन गंगाबाई प्रसूतसमई पुण्यांत होते. त्यास पुत्राचा संषय पुसिला. त्याणीं सांगितलें कीं, प्रसूत जाली ते अर्भक निवर्तले, उपरांत दुसरे घेतले असेल, निवर्तल्याची खबर आह्मी ऐकिली, पांचजणी बायका गरोदर जवळ होत्या. याप्रमाणे सांगितले. १
श्रीमंतांस आह्मी पत्र पाठविले आहे कीं, कामकाज लागल्याची आज्ञा करावी ह्मणोन मेस्तर माष्टानानें सांगितलें. उपरांत बापू सारस्वताची गांठ घालून दिल्ही जे, सरकारचे कामकाज आज्ञेवरून हे तुह्मांस सांगतील, त्याप्रमाणें करून देत जावे. त्याणी कबूल केले. अनुष्टानाच्या ब्राह्मणाचा मजकूर सांगितला. त्याचे हरएक साहित्याविसी कबूल केले. तयास, महाराजांनी या उभयतांस पत्रें व किरकोळ आज्ञा करणें ते करीत जावी. आज्ञेप्रमाणे करितील. १
आज्ञेचे अन्वयें निकडीनें मुंबईस पोहचावें, ह्मणोन कस्त करीत आहें. परंतु पर्जन्य भारी व कीम नदीस उतरावयास उपाय नाहीं. यास्तव एक दिवस अधिक लागला. १
मेस्तर होमानें सरकारांत पत्र इष्टोलाचें लखोट्यांत घालून पाठविलें. रूबरू नेऊन गुदरणें, ह्मणोन त्याजला लिहिलें. मेस्तर टेलर बंगालियास श्रीमंताचे कामाकरितां गेला, भाद्रपद शुध्द ३ मंगळवार, आज दहा दिवस जाले, ह्मणोन सांगितले. त्यावरून मित्ती लिहिली असे व पत्र दिल्हें ते पाठविले आहे. सेवेसी पावेल. १
येणेंप्रमाणें येथील वृत्त कच्चे सेवेसी कळावे ह्मणोन लिहिलें आहे. सुरतेस जाऊन, गंभीरास बोलून, जलदीनें मुंबईस जातो. उभयतां मेस्तर ज्या गलबतावर बसोन मुमईहून आले, तें गलबत चांगले. त्याजवर बसोन जाणें, ह्मणोन उभयतांनीं सांगितलें. त्याप्रमाणें जातों. जनरालास स्वामीचे कामाचा अभिमान बहुत पडला आहे की, केली गोष्टी सिद्धीस न्यावी, याप्रमाणे बहुतजण इंग्रेज सांगतात. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.