लेखांक २७.
(आळंदीजवळ बेटांत पांडुरंगाश्रम नांवाचे एक महाराष्ट्र ब्राह्मण परमहंस असत. त्यांना थोरले बाजीराव बल्लाळ फार मानीत असत. त्यांच्या संबंधाने खालील पत्रे आहेत. पांडुरंगाश्रमाची सध्या आळंदीस बेटांत समाधि आहे. ह्यांच्या शिष्यवर्गात कृष्णराव महादेव चासकर हे असत. सबब, परमहंसांची कांही कागदपत्रे चासकरांच्या दप्तरांत सापडली. ह्या पत्रांवरून स्वामींची इनामाविषयी विवंचना दृष्ट्युत्पत्तीस येते; शिवाय अवांतरही अनेक बाबी इतिहासोपयोगी आहेत.)

श्री.
१६५५ अधिक आषाढ वद्य ३०.
राजश्री देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी, पा जुन्नर, गोसावी यांसी- अखंडित-लक्ष्मी-अलंकृत-राजमान्य-राजश्री बाजीराव बल्लाळ प्रधान नमस्कार. सु|| अर्वा सलासैन मया व अलफ. मौजे केळगाव, ता चाकण, पा मजकूर, हा गाऊ बागायतीचा मोकासा श्रीपांडुरंगाश्रम परमहौंस, वास्तव्य क्षेत्र आळंदी, यांस दिला आहे. तरी, तुम्ही मौजेमजकुरास ताकीद करून मौजेमजकुरचा बाबतीचा आकार होईल तो ऐवज श्रीस्वामी यांजकडे सालदरसाल सुरळीत पावे ते करणे. प्रतिवर्षी ताजे सनदेचा उजूर न करणे. जाणिजे. छ २८ मोहरम *  आज्ञाप्रमाण. (लेखनसीमा) बार.