लेखांक २५.
श्रीराम
१७०२ पौष शुध्द १०. वेदशास्त्रसंपन्न राजश्री रामशास्त्री यांसी –

प्रति रखमाबाई नमस्कार विनंति. येथील कुशल पौष शुध्द दशमी जाणून स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे, विशेष. आपण पत्र पाठविले ते पावले. चिरंजीव मेघःश्यामपंत यांचे विभागाचा कजिया आहे, ऐशास येविसी श्रीमंतांची आज्ञा जाली, याकरिता आपणाकडील कारकून माहीत जाबसालास पाठवून द्यावा, म्हणून लिहिले त कळो आले. ऐशास, विभागाचा अर्थ आम्हांस तीन पिढ्या ठाऊक नाही. वरकड अर्थ म्हणावा, तर कैलासवासी होते त्याजलादेखील येविसी अर्थ कोणी केला नाही. त्यांचेमागे आपणास हा कालपर्यंत किमपि विदित नाही. ऐसे असोन, चिरंजीव मेघःश्यामपंत आपणास काय निवेदन करीत असतील ते न कळे. सारांश, आजपर्यंत जे गोष्ट दखलगिरीत नाही त्याविसी काय म्हणून म्हणावेॽ हा विचार सर्वांस ठाऊक नाही, ऐसा तो अर्थ नाही. तुम्ही विवेकी असा. याचे उत्तर प्रत्युत्तर तुम्हीच करावे. आम्ही लिहावे ऐसे नाही. चिरंजीव मेघःश्यामपंत याचे वडील होते, तेव्हाच ये गोष्टीचा विचार त्यांनी करावयाचा तो त्यांनी काय चित्तांत आणून न केलाॽ बरे त्यामागे कैलासवासी होते, तेव्हाही कोणी उपक्रम केला नाही. प्रस्तुत आम्हास ये गोष्टीचा विचार काय ठाऊकॽ हा कालपर्यंत नसता, हालीच उपक्रम करितात, तरी हा अन्वय आपणास न कळे ऐसा काय आहेॽ वरकड दत्तविषयींचा विचार, तरी आम्हांस कांही शास्त्रांत गम्य नाही. चार ब्राह्मण शिष्ट येथे होते. त्यांनी शास्त्राप्रमाणे केला आहे. येविसी आपणही शास्त्री पाहतील. बहुत काय लिहिणेॽ लोभ असो दीजे. हे विनंति.