त्याजवरून येथे कारकून पाठवून, दरबारखर्च करून, बाजीरावसाहेबी सांगवून राघोपंत राहविले. पुढे येथे मुलाचे ममतेचे होते, तितक्यांची पारपत्ये केली. राघोपंत बेहरे यांचे घरी चासेस चौकी बसविली. त्यांचे घरचे कारकुनास धरून नेले. बाळाजीपंत भिडे वगैरे जे जे त्यांत होते त्यांस चवकीपाह-यांत बसविले. दुसरे कोणी ममतेचे राहिले नाही. त्यानंतर पत्र लिहून आम्हांस पाठविले जे, पूर्वी विसाजीपंत वाडदेकर यांचा आमचा करार होता जे, दिवाण करून देतो, जुने कारभारी यांचा हिशेब सरकार आज्ञा घेऊन कृष्णराव तागायत आजपर्यंत हिशेब घेतो. दहा पांचा लक्षांची दौलत होती ती गेली, दरवडा पडला नाही किंवा कोणी दंड घेतला नाही, याचा विचार करतो, असे म्हणत होते. तो अकस्मात मृत्य पावले. त्यांचे बंधू आहेत. त्याकर्वी नवा कारभारी उभा करून, दरबारखर्च दहा पाच हजार रुपये करी असा सिध्द करून, आम्हांस लिहून पाठवावे. याप्रमाणे पत्र आम्हास आले. तो मजकूर विसाजीपंताच्या बुध्दीशी बोललो. वाणी बाजी मोरेश्र्वर शीघ करून त्याच्या उभयतांच्या शपथक्रिया होऊन आमची गाठ घालून दिल्ही. यानंतर येका दोघांचे साक्षीने शपथक्रिया घेतली जे, दरबारखर्च पडेल तो तुम्ही करावा त्यानी मान्य करून बंदोबस्त करून देतो, याप्रमाणे बोलून, दिवाणगिरीच्या कलमांची याद ठरवून चासेस पाठविली. त्याप्रमाणे त्यांनी त्यास पत्रे लिहून देऊन सरकारांत पत्रे लिहिली. नानांसही पत्रे लिहिली की, बाजी मोरेश्र्वर भावे यांस दिवाणगिरीचे कामकाज सांगितले आहे, व बजाबा शिरवळकर यांस वकिलीचे कामकाज सांगितले, हे विनंति करतील त्यान्वये बंदोबस्त करून द्यावा. अशी पत्रे मातक्यांत आली. ती बाजीराव मोरेश्र्वर यांनी नानांस व सरकारांस दिल्ही. बाजीराव बर्वे व बन्याबापू मेहेंदळे हे उभयतां यांजकडून श्रीमंत बाजीरावसाहेब यांस विनंति चासकराविसी केली, मुलास आणून बंदोबस्त करून द्यावा. त्याजवरून त्यांनी सांगितले की, मी कारभार करीत नाही, नानांपासून, रावसाहेबांपासून काम करून घ्यावे. त्याजवरून नागोजी गुंड याजकर्वी बाजीराव मोरेश्र्वर यांनी नानांस विनंति करविली. त्यानंतर त्यांनी उत्तर केले की, सध्या तूर्त काम होत नाही, अवकाशेकरून करून देऊ. त्यानंतर रावसाहेबांस विनंति केली ती जमेस धरून, बापू खटावकर याचे विद्यमाने श्रीमंत अमृतरावसाहेब बोलो लागले की, जुने कारभारी सात हजार देत असल्यास मुलास आणून बंदोबस्त करून देतो. असा नाद होता. हे वर्तमान चासेस कळतांक्षणी, कारभारी येथे येऊन, दरबारखर्च गणेशराव व बापू चिटणीस या उभयतांस हजार रुपये देऊन व बजाबा शिरवळकर यांस दरबारखर्च देऊन, श्रीमंत अमृतरावसाहेब यांस ऐवजाची निशा देऊन, सरकारी हुजरे असामी येरु बाळोजी शेलार बरोबर घेऊन, चासेस गेले. हुज-याने मुलास ताकीद केली जे, पुणियास जाणे ते बाईचे आज्ञेशिवाय व कारभारी यांचे आज्ञेशिवाय जाऊं नये. याप्रमाणे बंदोबस्त केला. त्याजवर आम्हांस पत्र पाठवून, गंगाबाईने बोलावून चासेस नेले. वेतनाचा ऐवज देतो, म्हणोन आठ रोज राहून घेतले. कार्तिकी एकादशीस आळंदीस येणार, म्हणोन पत्र बाजी मोरेश्र्वर यास मुलाने लिहिले जे, श्रीमंत अमृतरावसाहेब यांचे कानावर घालून, दहा राऊत मागून घेऊन यावे आणि आम्हांस श्रीमंतांच्या दर्शनास घेऊन जावे, असे पत्र आले. त्यावर मशारनिल्हेनी श्रीमंतांस विनंति करून राऊत मागून पाठविले; परंतु त्यांनी मुलास आळंदीस येऊ दिले नाही. सबब राऊत चासेस गेले. मुलाने राहून घेतले. पुणियास जातो म्हणो लागला. सबब गंगाबाई व कारभारी मिळोन पुणियास रावसाहेबाकडे कारकून पाठवून मनस्वी गैरवांका समजाऊन, बाजी मोरेश्र्वर यांस फजीत करून, स्वारांस मनाचिठी देऊन चासेस आले. रावतांस मनाचिठी देऊन उठोन लाविले. त्यानंतर आम्ही एका दोहो दिवशी निरोप घेऊन निघालो. बरोबर विसाजीपंत वाडदेकर यांचा भाऊ तेथे मुलाजवळ ठेविला होता तोही बरोबर निघाला. घोडी तयार होऊन बाहेर येऊन वरते बसावे तेसमई गंगाबाईने घरांत आम्हांस बोलावून नेले आणि बोलो लागली जे, आपण आज जाऊ नये; उदयिक जावे, आता प्रहर दिवस आला, पुणियास पोहोचणार नाही, प्रातःकाली उठोन एकमजल पुणियास जावे, असे बोलोन, भीड घालून, आम्हां उभयतांस राहविले. यजमानांचे मर्जीस्तव राहिलो. उपरी तिसरे प्रहरी वाड्यांतील चर्या विपरीत द्रिष्टीस पडो लागली. तेव्हा मनांत कल्पना आली जे, मजला राहून घेतले यास कारण नाही. कांही कजिया आम्हांसी करावा असे गंगाबाईंच्या मनांत आले तर राहून घेतले, अशी कल्पना मनांत आली. म्हणोन गांवांतील गृहस्थ विठ्ठलराव मोघे व शंकरराव परभू या उभयतांस पाठविले. त्यांनी गंगाबाईस विचारले की, जोसीबाबास आपण प्राताःकाली निरोप देऊन निघाले असतां फिरोन राहून घेतले, त्यावरून त्यांचे मनांत कल्पना बहुत आल्या, म्हणोन आम्हास त्याणी बोलावून आणिले आणि आपणाकडे पाठविले, त्यास आपल्या मनांत त्यांशी कांही खटका कजिया करावयाचा आहे की कायॽ असे विचारिले. त्यांनी उत्तर केले की, त्यांसी कांही खटका करावयाचा नाही. हे ऐकोन उठोन आले. गंगाबाईचे बोलणे आम्हास सांगितले. फिरोन कारभारी यांजकडेसही पाठविले. त्यांनी उत्तर यजमानणीप्रमाणे केले. ते ऐकोन आम्हास सांगितले, स्वस्थ असावे, ऐसे बोलोन आपल्या घरास गेले.