फिरोन लबाडकी करील त्यास बिड्या ठोकितो, असा दाबबंदोबस्त केला. विसाजीपंत होते तोपर्यंत यथाकरारप्रमाणे आमचा कारकून मुलाजवळ, तीनशे रुपये वेतन देत आले. वडील मूल मुलाजवळ होता. आम्हांस दहा पात्रांची सामग्री देत आले. विसाजीपंत मृत्यु पावतांच, मुलास कैद केला. आमचा कारकून व वडील मूल लावून दिल्हा. सोदे लुच्चे जवळ ठेवून भांगपत्री चारू लागले. पाप राहो केला. प्रयोग करविले, त्या ब्राह्मणाचे ठिकाण लाऊन धरिले. तेही कबूल जाहले. गंगाबाईचा भाऊ व मामा व उमाजीपंत कारभारी मिळोन प्रयोग करविले, म्हणोन आम्हांस सांगितले. म्हणोन त्या ब्राह्मणाची दक्षणा बुडविली. तो ब्राह्मण पुण्यांत आहे, व दुसरे उपद्रव मुलास केले. गादीखाली ताईत व भालदो-या व चेडे व अनेक उपद्रव होतात. यांस कारण, जामदारखान्यावर कारकून होता तो काढून आपले आई, भावाचे घर भरिले. जामदारखान्याचे कामकाज आपले भावास सांगितले. निळकंठराव यांची वस्तवादी व रुप्याचे दागिने व पोशाख वीस पंचवीस हजारांचे होते तेही लांबविले. हे सर्व वर्तमान मुलास समजले. मुलाच्या गंगाबाईच्यामध्ये लबाडक्या करून द्वेष वाढविला. मुलास त्राता कोणी नाही, याजकर्ता मुलाने आग्रह धरिलाजे. श्रीमंतांचे भेटीस जातो, तेथे श्रीमंतांना समजाऊन माझी दौलत लुटली आहे त्याचा हिशेब घेऊन तिकडे गेली आहे त्यांची पारपत्ये करीन, असे बोलो लागला. कारभारी यांचा आग्रह पडला की, तुला श्रीमंताचे भेटीस जाऊ देणार नाही. पूर्वीपासून जुने कारभारी यांचा कित्ता येकच. निळकंठराव यांस सूर्यदर्शन पुणियास बेवी, वर्षेपर्यंत करू दिले नाही. वेडे खुल करून ठेवावे. नांवास मात्र अधिकारी. दौलत सर्व लुटावी. श्रीमंतांचे भेटीस जाऊ देऊ नये. येतद्विषयी गंगाबाई कारभारी यांस मिळाली, हे मुलास समजले. नंतर परभारे पत्रे लिहून श्रीमंताकडे पाठवून दिल्ही जे, स्वामीचे चरणाचे दर्शन व्हावे हा हेतु जाला, कारभारी येऊ देत नाहीत, याकर्ता कृपा करून पत्रस्वार पाठवून मजला घेऊन जावे. अशी पत्रे श्रीमंतास व नाना फडणविसांस पत्रे पाठवून बाळाजीपंत भिडे व राघोपंत बेहरे व लक्षुंभट कर्वे यांचे विद्यमाने पत्रे श्रीमंतांस दिल्ही. सविस्तर मजकूर समजाऊन, सरकारांतून राघोपंत बेहरे पाठवून मुलास आणवावा, असा निश्र्चय जाला. हे वर्तमान चासेस समजले.