Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक ५४५
श्रीशंकर.
१७२३ पौष वद्य १४
वेदशास्त्रसंपन्न राजश्री दीक्षित बावा स्वामीचे सेवेसीः-
विनंति सेवक येसाजी गायकवाड कृतानेक सा दंडवत विनंति. येथील क्षेम ता। छ २७ माहे रमजान जाणून स्वकीय लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. यानंतर अबदुल रजाख देशमुख पा। उडणगांव याणीं आपले भाऊबंदी +++ जिवे मारिलें. त्यास त्याच्या बाइका व मुलें श्रीमंतापाशीं फिर्याद जाली. श्रीमंत राजश्री रघुनाथराऊ दादासाहेब या प्रांतीं आले. त्यासमईं भेटीस बोलाविलें. त्यास, गैरहजर होऊन, पळोन जाऊन, त्याणीं देशमुखी जप्त करून, सेलवडेस ठाणें बसऊन झेंडा लाविला ! राजश्री नारो बाबाजी सुभेदार माहाय याच्या स्वाधीन ठाणें केलें, त्यास, आह्मांस नेना. ह्मणून आह्मी श्रीमंतास अर्ज केला की, ठाणेयांत कारकून दुसरा हुजूरचा ठेवणें. त्यास, त्याणी रा सदाशीवपंत कारकून ठेविले. देशमुखीची नजर घेऊन, यंदा गुमस्तगिरी आह्माकडे दिली. आह्मीं त्यांचे गुमास्ते पेशजीचे आहेत, तेच ठेविले. अखेरसालीं देशी गेलियाजवर, श्रीमंत जप्ती पंचाईत करून मोकळी करतील अगर त्यांच्या खातरेस येईल त्यास गुमास्तगीर सांगतील. ते मुलखाचें खावंद. त्याणीं जप्ती केली, ठाणें बसविलें. त्यास, अबदुल रजाख मागें कईत. फिर्याद वतन. त्याचें ठाणें मारितां त्यास आपल्यास जाग कोठें पाहिली ! वतन जाऊन ठिकाण नाहीसें होईंल. असें कर्म न करावें. श्रीमंत पुणियास आलियाजवर, त्यांसपाशीं जाऊन, हवाल सांगोन, अर्ज करून, त्यांची कृपा निर्माण जाहालियावर ते स्थापना करितील. त्यांची नालीस शहरीं केलीयानें त्यास विशाध येईल, ऐसें न करावें. तुह्मी त्यास फजित करून सांगणें कीं शहरीं नालीश कार्याची नाही. जर त्याणीं तुमचे नाइकिलें, नालीश केली, तरी त्यास ठिकाण नाहीसें होईल. येथें वार्ता उडाली आहे कीं, बहिर बक्षी आला आहे तो खेळवाडेवर येतो. ऐसी रोज आवई उडाली. याजमुळें पा उडणगांव फरारी जाहला. शिवणेंहि फरारी जाहलें, बहुत धूम माजविली. रोज पळ सुटला. सेलवाड वैराण जाहली. त्यास, साहेबी कृपा करून नबाव शाहनवाजखांजी यांस सांगोन, सेलवाड व उडणगांव याजविशीं बार खास चिठी मेहेरेनशीं देऊन पाठवणें, श्रीमंत राजश्री जाधवराऊ आपल्या पदरचे आहेत ह्मणून हे अर्ज साहेबास लिहिली. साहेबीं चित्त घालून, खामखाई बरखास चिटी घेऊन पाठविली पाहिजे. नाहीं तरी, उडणगांव परगणा वैराण जाहला. बक्षीची दहशत भारी पडली. याजमुळें रयत फरारी जाहली. या गोष्टीचा बंदोबस्त साहेवाखेरीज होणार नाही. ह्मणून अर्ज सेवेसीं लिहिली. विनंति लिहिली हे मान्य करून, बरखास चिठी घेऊन पाठवणें, देशमुख आपलेपाशीं राहों देणें. श्रीमंत पुणियास आलियाजवर, आमचे यजमान व साहेब मिळोन, त्याचा अर्ज करून मग जें होणें तें होईल. बहुत काय लिहिणे ? हे विनंतिलक्ष.