Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)
पत्रांक १३०
श्रीरामजयती १६९६ अधिक वैशाख शुद्ध १
वडिलांचे सेवेसीं साष्टांग नमस्कार विज्ञापना येथील क्षेम तागायत वैशाख शुा १ पर्यंत मुा लष्कर येथें श्रीमंत मातुश्री बाईसाहेब असों. यानंतर वडिलांकडून सांप्रत आशीर्वादपत्रें येऊन वर्तमान कळत नव्हतें त्यास हालीं मानाजी कलमे यांजबराबर आशीर्वादपत्रें पा तीं पावलीं. पावोन लिहिला मजकूर सर्व ध्यानात आला. कित्तेक प्रकारें सावधपणें लिहिलें. त्याप्रमाणेच माझी चालीची रीत आहे. चिंता न करावी. इकडील वर्तमान तरः राजश्री त्रिंबकराव मामांनीं सड्या फौजा करून राजश्री आनंदराव रास्ते व राजश्री वामनरावजी आपले फौजेसुद्धां श्रीमंतांजवळून निघोन बुणगें बागलकोटास टाकून मामाजवळ वडगांव जयरामस्वामींचें या मुक्कामीं येऊन पोंहचले. राजश्री विठल शिवदेव व नारो शंकर वगैरे पथकें मिळोन चवदा-पंधरा हजार फौज व श्रीमंत राजश्री नानासाहेब यांची फौज व नबाबाकडील जाबितजंग व श्रीमंत सेनासाहेबांची चार पांच हजार फौज, याप्रमाणें एकत्र होऊन, सडे होऊन, श्रीमंतांवर पाठीमागें गेले. श्रीमंतांनी मिरजेहून कुच केलें. ते विसां कोसांच्या मजली करून श्रीपंढरीवर गेले. मामांनी पाठीवर जाऊन कासेगांवास मुकामास वीस बावीस कोस चालून आले. धौशा व श्रीमंत नानासाहेब मागेंच होते. तों मामास चिठी आपलेकडील यजमानाची आली कीं, आज तुह्मीं माघारे सरून राहणें. याप्रमाणे जालें. तों मामांनी विचार केला कीं, फौजेंत फितूर आहे, या वेळेस लाग करावा. ह्मणोन अंदेशा न करितां तयार होऊन पुढें जावें तों श्रीमंत खासा सात आठ अंबा-या वीसपंचवीस हजार फौजेनें तोफखाना पुढें घालून, गाडदी वगैरे चालून आले. तों दोन सरबत्या तोफांच्या जाल्या. इकडून मामांनी उजवे बाजूस रास्ते, विठल शिवदेव व डावे. बाजूस राजश्री वामनराव उठले, तों बाजू मोडून श्रीमंत दादांचे लोक मार्गे सारिले. तो हुजुरांत पांच सात हजार मामांवर तुटोन पाटणकर, निंबाळकर आले. तों निशाणाचा हत्ती नेला. हत्ती पोट घालून मामावर मिठी पडली. तो फौज उधळली, मामाजवळ राजश्री निळकंठराव थोरात व फकीरजी खडतरे उड्या टाकून उभे राहिले. मामावर जखमा डोईस वार तरवारेचा, एक खांद्यावर, एक कुशीस, एकूण तीन वार होते. पाडाव त्रिवर्ग गेले. फौजा झाडून निघाल्या. तो पांचा सा कोसांवर श्रीमंत नानासाहेब मार्गी भेटले. श्रीमंत मुकामास गेले. मामांनीं उतावळी केली. सा-या फौजा एकत्र झाल्या असत्या तर चिंता नव्हती. परंतु होणारापुढें उपाय नाहीं. आमची थोडीबहुत फौज. बुनगियांत नबावाचे पिछाडीस श्रीमंत मातुश्री व सेनासाहेब होते. याप्रमाणें घडलियावर, राजश्री हरीपंत तात्या निभाऊन बुग्यांत आलें. सर्वांचें समाधान राखून गाहा फौजेचा राखला. श्रीमंत कूच करून मजल-दर-मजल परांड्यावरून, नगरावरून टोंक्यास गंगातीरास गेले. सा-या फौजा पाठीमागें. नबाबसुद्धां नगरच्या मुकामास आज आलों. राजश्री त्रिंबकराव मामा श्रीमंतांबराबर अटकेंत होते. ते जखमांनी हैराण होऊन मार्गांत खडकतच्या मुकामीं देवआज्ञा चैत्र वा ८ रविवारीं जाली ! ईश्वरसत्तेपुढें उपाय नाहीं ! आतां नबाबसुद्धां पाठीमागें जात आहेत. सर्व कामांत तात्या आहेत. पुढें होईल वर्तमान तें वरचेवर लिहून पाठवीन. राजश्री अंताजीपंतास वडिलीं पत्रामागेंच पाठवितों म्हणून लिा. परंतु पंतमारक्ल्हे आले नाहींत. तर, सत्वर पाठविले पाहिजेत. घरी गडबडीमुळें एक सर्रास निघोन जाणें जालें. ऐशीयास, प्रस्तुत वडिलीं स्वस्थ असावें. गडबड तिकडील वारली. घरास यावें. परंतु सावध असावें. काळ कठिण आला आहे. आम्हांविशीं चिंता न करावी. शरीरेंकरून हा काल पावेतों आरोग्यें असों. देशांत दरवडे पडतात ह्मणोन कळलें. ऐशीयास, रात्रींबित्रीं सावध असावें. दुसरें येथें आह्मी वडिलांचे आज्ञेप्रमाणेंच असों. खर्चाची निकड घरीं असेलच. बरें. सर्व चिंता श्री रघुवीर स्वामीस आहे. आजच राजश्री माहादाजीपंत नानास पत्रें येथून रवाना केलीं आहेत. पूर्वी लिहिल्याप्रमाणेच तेथून सत्वरच घडेल. बिडाकडे पागा गेली आहे. तेथे जफ्ती गेली आहे. येथे बोली स्वकीयांचे हातून पंचविसां राऊतांची करितों. एका दों दिवशी बिडास माणूस पाठवून घोंडी आणवितों. वाटेचें संकटच आहे. युक्तीनें आणवितों. चिरंजीव सौ गोपकाबाईचा मजकूरः भुतें गत घेतों म्हणतात, म्हणोन लिहिलें. उत्तम आहे. जें आपलें घरांत नाहीं तेच भगवंत आणितो ! चिंता केलियानें काय होतें ? जे गोष्टनीं विष्टगत घेत तें करावें. वडिलीं लिहिलें की, जें करणें तें युक्तीनेच करीत जावें, ऐशियास, कोणेविशीं चिंता नाहीं. अंताजीपंतास घरास एकंदर जाऊ देऊ नये. आम्हांकडे पाठवावें. त्यां समागमें आमची पालखी पुणियांत आहे ती पाठवावी. तबकडीखेरीज सामान असेल. ऐशीयास, पाठविली पाहिजे. शरीर अशक्त म्हणून चिंता न करावी. प्रसंग दिवस मेहनतीचे पडले आहेत. श्रीमंत मातुश्रीची ममता उत्तम प्रकारें आहे. मर्जीनुरूप सांगतील चाकरी तें करून असों. सर्वांसीं इष्टत्वें रक्षुन असों, राजश्री वामनरावजीची व राजश्री तात्यांची भेट एका दों दिवशी होत असते. श्रीमंतांचे फौजेतून लोक पथके कोणी कोणी आले. राजश्री भवानराव प्रतिनिधी व मलबा पानशे व नसिंगराव धायगुडे निघोन काल आले. तेथील फौजेचा धर सुटला आहे. पोटास एक पैसा नाहीं. पुढें घडेल तें पहावें. राजश्री रामाजीपंत कोंकणांतून आले नाहींत. त्यास बोलावू पाठवावें. परी घोडी सबर नसली तर कवडीस पाठवून काढवून आणावी. भिकूस पाठविला ह्मणजे काढऊन आणील. तर पाठविली पाहिजे. शिंग्यावर खोगीर ठेविलें म्हणून कळलें, उत्तम केलें ! दसरा पावेतों वर बसू नये. मग मर्जीस येईल तें करणे. पुरण दूध मिळत नाही, तर आबाळन ( न ) होईल ते करावें. बाळंभट केळकर यांचे रुा एकशें त्र्येपन आम्ही देणें होते ते वडिलीं दिले असतील, नसले दिल्हे तर द्यावे. आपल्यावर मातुश्रीची ममता आहे. या पत्रामागें आपल्या येण्यविशीं पत्रें येतील त्याप्रों यावयाचें करावें. चिरंजीव बाळाजी दिनकर याचें लग्न करावें. आळसावरे घातलियावर ठीक नाही. मूल तर चांगली आहे. जातें समईं विनंती केली होती. तेणेप्रमाणें भीड घालून करावें, जानोजी शिंदे व लिंबाजी शिंदे आपआपले ठिकाणीं पागासुखां सुखरूप आहेत. वरकड वर्तमान मागाहून लिहून पाठवितों, बहुत काय लिहिणे? हे विज्ञापना. इ०
राजश्री धोंडोपंत दामले स्वामीस सां नमस्कार विनंती उपरी लिा पा. तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. लोभ करावा हे विनंती. रा यशवंतराव यांस नमस्कार लोभ करावा हे विनंती. वो, नारायणभटजी काका सां नमस्कार विनंती. उपरी लिा पा. पत्र पाठवावयास अनुकूलता न जाली ! असो. परंतु उचित असेल तेच करावें, आम्हांविशीं चिंता न करावी म्हणोन ती मातुश्रीबाईस सांगावे. हे विनंती इ०