पत्रांक ५६६
श्रीसांब.
१७२४ वैशाख वद्य ९
श्रीमंत वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसीः-
विद्यार्थी बापू गोखले यांचे अनेक सां नमस्कार विज्ञापना विशेष, ता। वैशाख वैद्य ९ पावेतों आपले आशीर्वादेंकरोन श्रीसमीप खुशाल असों विशेष, आपण पत्र व बर्फी पाठविली ती पोंहचती केली. त्याचें प्रत्योत्तर आणोन आपणाकडे पाठवावें, त्यांस प्रविष्ट केल्यावर दुसरे दिवशीं ज्वर येऊन अस्वस्थ पडलों. त्यावर, पोर्णिमेअनंतर स्नान केलें. आतां शरीर स्वस्थ जालें, त्यास, हाली जाऊन कागदाचे प्रत्युत्तर पाठविले आहे. पावेल, अणखी वो चिंतु जोशी कायगांवकर आले होते. त्यांनी श्रीमंताची भेट बकंभटद्वारा घेतली. परंतु मोरोपंत गोडबोले यांच्या बंधूची भेट उत्तम झाली होती. याचा विचार काय असेल तो यावरून ध्यानास येईल. तथापि भेटीनंतर श्रीमंत वो हरिहर दीक्षित साता-यास असतात. सांप्रत ते आपल्या भेटीस येणार ह्मणोन सांगितलें. त्याजवरून रा। विसोबा नाईक थत्ते यास विचारिलें कीं हरिहर दीक्षित कोणते ? तेव्हां विसोबानाईक यांणीं सांगितलें कीं, श्रीमंत रा। वो रामचंद्र दीक्षित तात्या यांचे बंधू. ते बहुत थोर आहेत. पुण्यास त्यांचे येणें बहुत नाहीं. स्नानसंध्या बहुत कर्तात. साता-यास असतात. याचा विचार काय असेल तो लिहावा. मलाहि पुसलें कीं, त्यांचा संप्रदाय बोलावण्यावांचून यायचा नाहीं. त्यास, श्रीमंत वो नानाजी यांस लिहून काय विचार असेल तो समजवावायाकर्ता लिहिलें आहे. आणीक चिरंजी. वानीं पत्र पाठविलें आहे. त्यास, तेंहि आपल्याकडे पाठविलें आहे. हालींवर्तमान तरः पुण्याकडील सखाराम घाटग्या नगरास दो चौ दिवसीं येतील, पुण्यांत नाकेबंदी श्रीमंताची बसली. हालीं कारभार श्रीमंतच स्वतां कर्तात. कळावें. कांहीं दिवसीं विदुराचे पारपत्य होईल. कळावें. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.
रा बाबाइगोळे यांनी याद पाहून अधेली मागारी दिल्ही. यादहि मागोन पाठऊन देतो. हे विज्ञापना. *