पत्रांक ५६३
श्री.
१७२४ वैशाख वद्य १
पुा ती राजश्री बाबा वडिलांचे सेवेसीं:-
...नाहींतर मालेगांवास पठाणी मोरचे लावावे. याप्रों येशवंतरायाची ताकीद. मोरचे लावले ह्मणजे येशवंतराव याणींहि मालेगांवीं यावें, या प्रों त्याची बातमी खचित. येशवंतराव होळकर याचे लष्करांतून पत्रें येथें कोणकोणास आलें. मालेगांवीं येण्याचा मोठा इरादा आहे. येथेंहि सावधच आहेत. ईश्वर काय घडवील तें पाहावे. परंतु ठीक नाहीं. पठाण येथून ललींगास बारा कोसांवर आहे. एका दों रोजांत मालेगांवीं शहा त्यांचा येईल. दुसरें श्रीमंतांणी हुजरे येशवंतराव याजकडेस पा। होते. त्याजबा एक हत्ती व पांच घोडे वगैरे नजर श्रीमंतांस, एक कारकून अगोदर देऊन, पा आहे. काल मुकाम मालेगांवीं होता. हुजरे यांसीं किल्यांत बोलाविलें होतें. त्यांणीं वर्तमान सांगितलें कीं होळकर याची चाल कांहीं ठीक नाहीं. बहुत मुद्दे घातिले आहेत. हे मुद्दे प्रों जाल्यास, मग आह्मी कांहीं ठाणीं घेणार नाहीं व उपद्रवही होणार नाहीं. या प्रों बोलणीं जालीं. उगेच समाधानास्तव हत्ती वगैरे पाठविले आहेत. परंतु त्यांचे ध्यानांत श्रीमंत वगैरे कोणीच नाहीं. याप्रों या प्रांतांत गर्दी आहे. येरंडोल भडगांव येथें खंडणी माणे याणीं घेतली असतां पुन्हां येशवंतराव यांणीं रोखे केले. तेव्हां निरुपाय जाणून येरंडोल भडगांव उज्याड जालीं, काशीराव होळकर हे येशवंतराव यांतून फुटून सेंदव्यास किल्यांत जाऊन बसले आहेत. शिंदे याजकडील फौज गोपाळरावभाऊ बराणपुरास अलीकडे एक मजल आले आहेत. सरजेराव वगैरे हेहि ब-हाणपुरावर आहेत. मालेगांव वगैरे येथील गुंते उलगडून मग ब-हाणपुरास जावें. याप्रों बेत आहेत. मग काय घडेल तें पाहावें. आणिक नवल विशेष ल्याहावयायोग्य नाहीं. जिवाजी येशवंतहि येशवंतराव होळकर यांजपाशीच आहेत. सेंदुर्णी वगैरे महालांत ठाणीं जिवाजीचींच आहेत. कोणी महाल वस्तीस राहिले नाहींत. ऐसें आहे. कळावें, बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड दहावा (१७६१-१८१७)