पत्रांक ५०३
श्रीनाथप्रा.
१७२२ कार्तिक वद्य १४
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री नारायण दीक्षित ठकार स्वामीचे सेवेसीः-
सेवक दौलतराव सिंदे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहिणें. विशेष. मौजे माहागांव येथील बाळाजी बिन फुरंगोजी व सुलतानजी बिन मानाजी व राणोजी बिन धोंडजी चव्हाण पाटील यांची पाटीलकी पूर्वीची असतां, अलीकडे सुलतानजी बिन मुरारजी व आपाजी बिन सलतानजी व मुरारजी बिन सुलतानजी लाड यांणीं धटाईनें पाटीलकीचा सोळावा हिस्सा देतात. अलीकडे त्यांतही खलेल केली ह्मणोन समजलें. त्यावरून हें पत्र आपणांस लिहिलें असे. तरी आपण लाड यासी बरें वजेनें ताकीद करून चव्हाण याची पाटीलकी सुदामत पासून चालत आली आहे, त्याप्रों चालवीत, तें करावे. येविसी पुन्हां बोभाट न ये तें करावें. रा छ २७ जमादिलाखर, सुा इहिदे मयातैन व अलफ, * बहुत काय लिहिणे ? हे विनंती.