पत्रांक ४९७
१७२२ ज्येष्ठ शुद्ध १५
पै।। ज्येष्ट कृष्ण २ शके १७२२. श्रीसांब.
श्रीमद्वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी:-
विद्यार्थी बापू गोखले याचे अनेक सां नमस्कार विज्ञापना ऐसीजेः आपली आज्ञा घेऊन निघालों तों गुरुवारीं षष्टीस कान्हेरास पोहोंचलों. यानंतर राजश्री यशवंतरावजी याजबरोबर जुन्नरास आलो. ते जेष्ठ शुद्ध पौर्णिमा पावेतों आपले कृपावलोकनेंकरून आनंदायमान सुखरूप आहें. विशेष. श्रीमंत अमृतराव, बाळोबातात्या, आबा चिटणीस आणखी चक्रदेवप्रभृति * नकारमंडल सर्व एकत्र होऊन, नकारास दत्तक द्यावा, असा ठराव जाला. तो श्रीमंत बाजीरायास कळला. त्यांनी दवलतरावास सांगून बाळोबास कैद करविला. त्यामुळें अलिकडेस उभयतां श्रीमंतांचीं चित्तें शुद्ध नाहींत. शिंदे यांचा विचार तर लखबा व अल्लीबहादूर, येशवंतराव होळकर, बाया सर्व एक विचारें होऊन, हिंदुस्तानांत दवलतराव यांस ठिकाण ठेविलें नाहीं. इकडेस अमृतराव व दवलतराव यांशीं चुरूस लाऊन दिल्ही आहे. कोणीही हलका झाल्यास बरेंच आहे. श्रीमंत दादाविषई आपाजीपंत यांणीं दवलतराव यांसी बोलणें करून, पंनास लक्ष रुपये द्यावे. त्यापैकीं निमे सरकार व निमे तुह्मी, असे घेऊन हिंदुस्तानांत तुह्मीं जावें. त्यानें कबूल केलें. त्यावरून मशारनिल्हे यांनी कारकून पाठविला. जुन्नराचें प्रत्युत्तर, आमचा अदृष्टियोग असल्यास सर्व घडेल,
आह्मांस कपर्दिक द्यावयास मिळत नाही. तेव्हां तो विचार राहिला. बाजीराव यांचे चित्तांतून यांस द्रव्य न पडतां घेऊन जावें. परंतु अमृतराव यांचें भाषण विचार पाहातां, तूर्त न आणावें. यामुळें सांप्रत राहिलें. यांस चांचवड किल्ला जुन्नरापासून पांचा कोसांवर दिल्हा. ३० सहस्त्र रुपये दिल्हे. आमचे यजमान तर बंधूचा विभाग करावा ह्मणोन येथें आले. येऊन त्यांनी यांणीं उभयतां दादाचे पायावर हात ठेविले. आपण जसा विभाग कर्तील त्यांस आह्मीं राजी. यानंतर विभाग होतील, त्या अन्वयें सेवेसीं लिहून पाठवीन. येथील आमचा विचार तर कोण्या रीतीचा आहे तो तीर्थस्वरूप आपा आठापंधरा दिवसां घरी आल्यावर कळेल. हें पत्र ब्रह्मभटजी जवळ देऊन वडिलांस दाखवावें. आपला पुण्यास जावयाचा बेत कसा झाला, हें लिहावयाविषयीं आज्ञा जाली पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.
हेच पत्रीं वेदमूर्ती ब्रह्मभट व बाळकृष्णभट यांस सां नमस्कार, कृपावृद्धी लोभाची करीत जावी. हे विनंती.