पत्रांक ४९५
शेवेसी विनंति सेवक क चो जनार्दन, निसबत केशो भिकाजी, कृतानेक सां नमस्कार विज्ञापना ता। छ २२ माहे जिल्हेज मु।। लष्कर नजीक बर्डावदा येथे शेवकांचे वर्तमान यथास्थित असो. विशेष इकडील वर्तमान छ १७ मीनहूस विनंतिपत्र लिहून मुकाम पंचगवा येथून सेवेसीं रवाना केलें आहे. त्यानंतर येणेंप्रमाणे :-
१ छ १८ मीनहूस तेथून कूच होऊन मौजे नामलीपचोर, परगणें रतलाम, येथें मु।। केला. चिमाजी बुळे याचे कनिष्ट चिरंजीव गोविंदराव बुळे पाऊणसें स्वारांनिशीं येऊन भेटले. राजश्री यशवंतराव होळकर सामोरे गेले होते. समागमें डे-यास घेऊन आल्यावर, ते आपले मिसलीवर गेल्यावर त्यांचे येथें सरदार गेले. त्यांणीं वस्त्रें तिवट शेला दिल्हा. कलम
(* संक्षेपार्थ मामुली शब्द आह्मीं सोडले आहेत.)
१ उज्यनींत मीरखापठाण व दुदरनेक फिरंगी, चिमाजी कृष्ण ऐसे फौजेसुद्धां गेले होते. ते, बाळोजी इंगळे व लक्ष्मण अनंत यांचा सलुख, बाळाजी अनंत पागनीस यांचीं पत्रें आल्यावर, होऊन भेटी जाल्यामुळें, ठाणे बसवायाची मसलत राहून, येथून सरदारांनीं पत्रें त्रिवर्गास पाठविलीं कीं, तुह्मीं फौजेसुद्धां महत्पुरास जावें. त्याजवरून ते महत्पुरास गेले. तेथून तुलसाजी वाघ याजवळून येवज घेऊन, सरंजाम जप्त करावा या बेतावर गेले. कलम.
१ इंगळे व लखबा एकत्र जाहाले, उखबा उदेपुराकडे गेले. इंगळे मल्हारगडाकडे आले. सरदारांस लखबाकडे न्यावें, सबब लक्ष्मण रघुनाथ फौजेसमागमें आहेत. सलूख उभयतांचा जाला नवता, तोंपरियंत यांची कूच जल्दी करून सरदारास न्यावें हे जरूर होती. आतां मतलब जाल्यामुळें जरूर नाहीं. लखबा चितोडाहून उदेपुराकडे गेले. कलम.
१ सरदार यांणीं रतलामची खंडणी चाळीस हजार रुपये घेतले. पुढें देवळेप्रतापगडास जाणार तों तेथील वकील रुजू होऊन भेटले. जाबसाल होत आहे, तों इंगळे यांणीं फौजेसुद्धां देवळेप्रतापगडावर शह दिल्हा. घांसदाणा मागतात. त्याजवरून सरदारांची मर्जी क्रूर जाली. इंगळे यांणीं होळकर यांचे गांवास उपद्रव दिल्हा, याजकरितां लढाई घ्यावी हा विचार आहे. फिरंगीमरिखा याजलाही पत्रें जलद यावयाविशीं गेलीं आहेत. सांप्रत, देवळे प्रतापगडाचा शह सरदारांनी सोडून, छ मजकुरीं येथें मुकाम केला. आबाजी लक्ष्मण शंभर स्वारानिशीं सरदारास मु।। मजकुरीं येऊन भेटले. येतेसमई महेश्वरावरून आले. पंत मशारनिले आले आहेत. यावर काय घडेल तें पाहावे. गोवर्धन ( भील ?) समागमें आहे. कलम.
१ मीरवजीर हुसेन दोनशें स्वार व पायदळ पांचशें ऐसे आपले सरंजामानसी. त्याजला महत्पुरास मागील मुकामहून रवाना केलें आणि वराता महत्पुरावर लाख रुपयांच्या केल्या. ऐवज वाघाकडून घेऊन, वरातदारास देऊन, त्याजला येथें घेऊन यावें, या बेताबर रवाना केला. कलम.
१ चिमाजी बुळे यांचे चिरंजीव विठुजी याचे चिखलदे वगैरे महालच्या जप्ती राजश्री आनंदराव पवार यांजकडे सांगून, सनदा करून दिल्ह्यासिवाय पवार मजकूर याजला चाळीस हजार नक्त दिले. त्यांणीं थोरलें काम नागोपंताचें करून दिल्हें, म्हणोन बक्षीसी दिली. बुळेमजकूर कनिष्ठ येथें आले. त्यांणीं जाबसाल लावला. लाख रुपये घेऊन, महालाची सोडचिठी देऊन, मुक्त करावें, शंभर स्वारानसी चाकरी करूं, याप्रमाणें बोलणें संताजी लांबहातेचे विद्यमानें लागलें. हाली बुळ्यावर वराता करून दिल्ह्या, हशमी शिलेदाराच्या. कलम.
--------
६
येणेंप्रमाणें ध्यानास येईल. उत्तराची आज्ञा होऊन खर्चाचा बंदोबस्त जाला पो. हे विज्ञापना.