पत्रांक ४९४
श्री. १७२२ चैत्र.
पौ मिती वैशाख वद्य १२ शके १७२२
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री लक्ष्मीनारायण दीक्षित स्वामीचे सेवेसीं:-
विद्यार्थी यशवंतराव महादेव सां नमस्कार. * विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. वेदशास्त्रसंपन्न राजश्री मोरेश्वर दीक्षित यांस औषधा करितां मंडूर दोन तोळे पाठवावा, म्हणोन लिहिलें. त्याजवरून दोन तोळे मंडूर माणसाबराबर पाठविला आहे. पावेल. आपल्यास औषध पाठवावयाचें तें, आठाचौ दिवशीं राजुरास जाणार आहे, तेथें गेल्यावर पाठवीन. औषध राजुरास राहिलें आहे. येथें नाहीं. वरकड राजकीय नवल विशेष लिहिणेसारिखें नाहीं. राजश्री सिद्धेश्वर महिपत म्हणोन कारकून सरकारचे हे फौज जमा करून गावड्यावर जाणार, म्हणोन म्हणतात. आणि खंडण्या घेतात. त्यासह त्याप्रांतीं येणार आहेत. बहुत प्रळय या प्रांतीं केला आहे ! तो लिहितां पुरवत नाहीं ! आपण सावध असावें. यास विचार काडीमात्र नाहीं. याजकरितां लिहिणें आहे. बहुत काय लिहिणें? लोभ असों दिजे. हे विनंति.