पत्रांक ४९३
श्री. १७२२ चैत्र शुद्ध १२
श्रीमंत राजश्री पंतप्रधान साहेबाचे सेवेसीः-
आज्ञाधारक आपाजी पायगुडे दंडवत विज्ञापना. तागायत छ ११ जिलकाद पावेतों मुक्काम नजिक किल्ले कावनई साहेबांचे कृपाकटाक्षें पागापथकाचें व सेवकाचें वर्तमान यथास्थित असे. विशेष ......... डोंगर कावनई .......... जमा जाहलें होते यास्तव आस्वलीचे मुकामींहून कुच्य करून किल्यानजीक आलों. फौजेचे दहशतीनें कोळी डोंगर सोडून पट्याकडे गेला. छ. ७ जिलकादीं कोळी यांनी किल्लेपट्यास येलगार केला. किल्लेकरी सावध होते. व राजश्री बापूजीपंत गार्दीसुद्धां येऊन पोंहचले. कोळीयांचे पारिपत्य थोडेंबहुत जाहलें. आम्हांस केळ्याची बातमी लागतांच, छ मजकुरीं स्वार होऊन गेलों. मौजे खेडानजीक दक्षणेस डोंगरालगती गांठी पडली. आम्हांकडील निकड पाहून, दहशतीनें कोळी पळून पहाडांत गेले. गोळागोळी बरीच जाहली. त्याजकडील तट्टें, पथकांतील लोकांनीं दहापंधरा पाडाव करून आणिलीं. तें समयीं पाईचे बरकंदाज असते तरी कोळ्यांचें पारिपत्य जाहलें असतें. स्वारांचा इलाज अवघड डोंगरावर कळतच आहे ! याप्रांतीं कामगिरी नेमल्यासारिखें सरकारकामाचा बंदोबस्त होय तें जाहलें पाहिजे. तालुकदार यांजकडील पाईचे लोक व लढवई सामान.........एक जागा जाहालों, ह्मणजे कोळी मैदानांत येत नाहीं. मागाहून सविस्तर लेहून कळऊं. रोजमरियांविशीं लिहिलें, त्याचे उत्तराची आज्ञा जाली पाहिजे. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.