पत्रांक ४९२
श्री. १७२१
पु।। विनंती उपरी.
करवीरचा मजकूर तरीः येथे श्रीमंत राजश्री सिंदे याजकडे तिकडील बोलणाराचें बोलणें या सर्जेराव घाटगे वगैरे यांचे विद्यमानें पडोन रा।। विस्वासराव घाटगे सर्जेराव यांणीं व राजश्री जोसीराव यांणीं येथें जलदीनें यावें आणि तेहाचें बोलणें बोलावें. तोंवर पंधरा रोज गोळागोळी होऊं नये. ऐसीं पत्रें सिंदे यांजकडील तेथें गेली आहेत ह्मणोन आइकण्यांत आहेत. शिवाय बाजारांत बोलणीं आवाया बोलतात कीं, वीस लाख रुपये करार करावे. पो तूर्त निमे दहा द्यावे. यांत निमे सरकार व निमे सिंदे. या खेरीज कलमें काय असतील ते असोत. परंतु चिकोडीमनोली तालुके राजमंडलाकडे राखावे, अशीं बोलणीं या आवाईत आहेत. याकरितां तुह्मांस फार कळावें, ह्मणून सूचनार्थ लिहिणें आहे. पायाशुद्ध तह जाहालियास, सर्व यथास्थित आहे. परंतु कैसें घडेल, तें पाहावें.