पत्रांक ४९१
श्री. १७२१
सेवेसी सां नमस्कार विज्ञापना ता। मंदवार पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. काल निरोप घेऊन आलों ते अस्तमानी पोंहोंचलों. चिरंजीव रा. नरहर बापू शहरांत भेटले. त्यांणीं सांगितले कीं, मी कामगिरीस जातों. तेथून आल्यावर पत्र देईन. ते लष्करांतून चंद्रोदयीं निघोन नगरास गेले. फडणीस तेथें होते त्यास नेलें. बरोबर फौज आहे. हें वर्तमान श्रीमंतास आज कळलें, त्याजवरून मर्जी दिक्क आहे. रा. बाळोजीबाबा सकाळीं वाड्यांत जाऊन लष्करांत गेले आहेत. नगराहून बक्षी व बाळोबातात्यास आणावयास सांगितलें आहे. आज गोविंदराव बापू यांचे घरीं हुजरातचे लोक बसले आहेत. दोन आठवडे व येक दुमाही देतों, ऐसा करार परवां करून वाड्यांतून लोक त्यांणीं उठऊन आणिले. त्यास आठ दिवस जाहले. ऐवजाचा फडशा करून द्यावा ह्मणोन बसले आहेत. आबा शेळूकर यांस सुभ्याचीं वस्त्रें परवांचे दिवसीं जाहलीं. साते-यास कारभारास तात्या जोशी पो होते. येथें आणविले आहेत. रावसाहेब यांचा अद्याप मुक्काम आहे. कुच्य जाहालें नाहीं. बाजीपंत आंणाचे लेक तात्या पळोन गेले. बाळोजीबावांनी च्यंदनचा किल्ला महिपतराव मामास सांगितला, काल वस्त्रे दिल्ही. यांची प्रकृति बरी आहे. कंपूचें कुच्य होऊन हडपसरावर गेला आहे. करवीराकडे त्यास मोहीम सांगितली. याप्रों वर्तमान आहे. पिकली पानें पांचशें पा। आहेत. केशर मागाहून घेऊन पाठवितों. सेवेसीं श्रुत होय. हे विज्ञापना.