पत्रांक ४८८
श्री. १७२१ माघ शुद ५
राजश्री विश्वासराव नारायण गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नेहांकित दौलतराव शिंदे विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीये लिहीत जावें. विशेष राजश्री आपाजी रामचंद्र मालगांवकर यांचा व जोती मोरेश्वर यांचा देण्याघेण्याचा लढा आहे. त्यांस उभयतांची बोलणीं तुमचे विद्यमानें जालीं असतां, हाली जोती मोरेश्वर आपाजी रामचंद्र यांचे घरीं उपद्रव करत आहे, म्हणोन विदित जाहलें. त्याजवरून हें पत्र तुम्हांस लिहीलें असे. तरी तुमचे विद्यमानें बोलणीं जाली असतां, घरी जाऊन उपद्रव करावयाचें प्रयोजन काय ? तरी त्याचीं माणसें यांचे घरीं बसलीं असल्यास, बेमुरवत उठऊन देणें आणि पुन्हां याचे घरीं उपसर्ग होऊं न देणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. रा। छ ४ रमजान, सु।। मयातैन व आलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंति.