पत्रांक ४८६
श्री. १७२१ भाद्रपद शुद्ध ३
मा। अनाम देशमुख व देशपांडे, पो आकोट, प्रांत वराड, यांस बाजीराव रघुनाथ प्रधान. सु।। मया तेन व अलफ. मौजे खुडगांव, पो मजकूर येथील निमे अमल रामचंद्र दादो, दी।। राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब, यांजकडे सरंजामास चालत होता. त्यास, ते मृत्यु पावले, सबब सदरहूं अंमल सरकारांत जप्त करून, जप्तीची कमावीस राजश्री त्रिंबकराव अमृतेश्वर यांजकडे सांगितली आहे. ते दूर करून सालमजकुरापासून राजश्री नारायण बाबूराव मौजे मजकूरचा निमे अंमल जातीचे तैनातेंत बदल मुशाहिरा करार करून दिल्हा असे. तरी तुह्मीं मशारनिल्हेसी रुजू होऊन, अंमल सुरळीत देवणें. जाणिजे. छ १ रबिलाखर. आज्ञाप्रमाण.