पत्रांक ४८४
श्री. १७२० पौष शुद्ध १२
श्रीमंत मातुश्री गंगाज्यान्हवी बयाबाई व ताई वडिलाचे सेवेसीः-
आज्ञांकित यशवंतराव धोंडदेव कोल्हटकर कृतानेक सां नमस्कार विज्ञापना येथील क्षेम ता। पौष शुद्ध १२ पावेतों आपले आशीर्वादें घरीं सर्व सुखरूप जाणोन स्वकीय कुशल लेखनाज्ञा करीत असलें पाहिजे. विशेष. फार दिवस वर्तमान तिकडचे कांहीं नाहीं, ह्मणोन काळजी वाटते. अकस्मात रा। पांडोबा तात्यांनी शहराहून पौष शुद्ध २ स सविस्तर लिहून पत्र पाठविलें. त्याजवरून आद्यंत मजकूर कळों आला. येथून दोन च्यार पत्रें श्रीमंत राजश्री आपाचे नांवें लिहून सविस्तर लिहिलें होतें, त्याजवरून सेवेसीं मजकूर अवगत जालाच असेल, तूर्त या प्रांतीं उणा आहे. परंतु बाहेरचीं वर्तमानें ऐकोन चित्तास काळजी वाटते. कोणते वेळेस काय घडेल समजत नाहीं. होळकर यांची फौज उजेनप्रतीं दाहापांच हजार आली होती. तेथें लढाई होऊन बरोबरी जाली, ह्मणोन वर्तमान आहे. शिंदे यांचें लष्कर पूर्वस्थळावरच स्वस्थ आहे. या वेगळें इकडे नवल विशेष नाहीं. आमचेकडील कुशल व राजश्री तात्याकडे माणूस गेलाच असेल. त्याजकडचें वृत्त सविस्तर लिहून पाठवावें. सार्वकाळ पर्त्रोतरी सांभाळित असावें. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.