पत्रांक ४५०
श्री १७१८
यादी विठोजी भोईटे आरडगावकर, सु।। सबा तिसैन मया व अलफ. मलजी भोईटे यास पुत्र संतान नव्हतें. याकरितां त्यांणीं आम्हांस दत्तपुत्र येऊन आमचे लग्न केलें. हाली मलजी भोईटे मृत्यु पावले. नंतर त्याचे सरंजामाची वहिवाट करावयास लागलों. तों माहादजी भोईटें यांणीं राजश्री बालोबा पागेनीस यास गैरवाखा समजाऊन, मलजी भोईटे याच्या हिशोबाचे सरंजाम वगैरे पौ मा।री येथील अमल माहादजी भोईटे याजकडे चालवणें. पुढें मनास आणोन आज्ञा करणें ते केली जाईल, म्हणोन पत्रें सरकारचीं मशारनिलेनें घेतली. त्याजवरून सरकारांतून राजश्री नारोपंत चक्रदेव यास सांगितले कीं, माहादजी भोईटे व विठोजी भोईटे यांचे मनास आणणें, त्याजवरून बलवंतराव नागनाथ यास उभयतांचे मनास आणण्यास नारोपंतांनी सांगितले. तेव्हां, विठोजी भोईटे बलवंतराव नागनाथ यांसी रुजू होऊन आपला मा।र सांगितला. याप्रमाणें सरकारांतून मनास आणावयास सांगितलें. तें आम्हांस माहादजी भोईटे यांणीं न सांगतां, विठोजी भोईटे यास तसदी पोचऊन आणविलें कीं, विठोजी भोईटे यांणीं क्रियेस जावलीस राजी व्हावें. त्याजवरून विठोजी भोईटे क्रियेस राजी जाहले. माहादजी भोईटे क्रियेस सरले, म्हणोन हें पत्र सादर केलें असे. तरी, परगणे मजकूर येथील अंमल मलजी भोईटे याच्या सरंजामाचे हिश्शाचा विठोजी बिन मलजी भोईटे याजकडे देणें.
म्हणोन-----------------------------------पत्रें
१ पौ नसिराबाद येथील हिश्शाचा अमल देणें म्हणोन पत्र.
१ देहे--हाय दरोबस्त यांस पत्र.
१ मौजे जलगांव.
१ मौजे सुनसगाव.
१ मौजे खडकी.
१ मौजे तुळसुंबे.
-----
४
------------------------------------------------पत्र
१ देहेहाय येथील हिश्शाचा अंमल देणे, म्हणोन पत्र.
१ मौजे उमाले.
१ मौजे धानवड.
-----
२
------------------------------------------------पत्र
१ सुभेयास पत्र.
१ कमावीस-दार, का। नसिराबाद, यास.
१ देशमूखदेशपांडे, का। नसिराबाद, यास पत्र.
१ रघुनाथपंतआबा, किल्ले असरीचे सुभेदार, यास पत्र.
१ मौजे वाठार, पा। वाई, येथील हिश्शाचा अंमल देणें, म्हणोन पत्र.
-----
८