पत्रांक ४४८
श्री लक्ष्मीकांत १७१८ फाल्गुन वद्य ३०
राजश्री नारायण बाबूराव गोसावी यांसीः--
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य श्रे।। रघोजी भोंसले सेनासाहेबसुभा दंडवत विनंती. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुम्हीं पत्र छ १६ रमजानचे तारखेचे सातारियाचे मुकामींहून पाठविलें ते पावलें. लिहिला मजकूर कळला. राजश्री बाळाजीपंतनाना राजश्री बाजीराव यांचा निरोप घेऊन श्रीमंत छत्रपती याजवळ वस्त्राचे योजने करितां आलें. समागमें मीहि आलों. मागाहून राजश्री बाजीराव वस्त्रें घेण्याकरितां येणार, आपणास बातमी असावी, म्हणोन राजश्री नानांनीं चिठी लिहून श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव यांजकडेस पाठविली असे. उभयेतां सविस्तर लिहितील. सांप्रत दिवस अडचणीचे. कैसेंही बनल्यास आपली दिष्ट इकडेस, हें वारंवार उपरोधिक काय ल्याहावयाचें आहे, म्हणोन तपसिलें लिहिलें तें विस्तारें कळलें, व राजश्री बाळाजीपंतनाना यांनी चिठी पाठविली ती राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव यांनी इकडेस पाठविली. याजवरून व उभयतांचे लिहिल्यावरून सर्व समजलें. त्यास, राजश्री बाळाजीपंतनाना यांचे जातीशी दुसरा भाव ठेवलाच नाहीं... त्याचा इशारा यावा त्याचप्रों घडावें, हें पहिलेंहि घडलें आहे पुढेंहि याचे इशा-याप्रमाणें घडेल. येविसीं तुह्मीं खातरजमा करावी. सर्वात्मना लक्ष राजश्री बाळाजीपंतनाना यांजकडेस आहे. प्रसंग अडचणीचे आहेत. जेथें हिम्मत बाहाल आहे, तेथें येविसींची चिंता कांहीं असत नाहीं. श्रीदयेनी चांगलेच घडेल. जे वेळेस राजश्री बाळाजीपंतनाना यांचा इशारा येईल, ते वेळेस त्यांचे जवळच समजावें. यांत सर्वथैव दुसरें नाहीं. यांत सर्व अर्थ आले. राजश्री बाळाजीपंतनाना यांचे चिठीचें उत्तर लेहून, राजश्री श्रीधर लक्ष्मण व कृष्णराव माधव याजकडेस पाठविलें आहे व उभयतांसहि सविस्तर लिहिलें आहे. त्याप्रमाणें तुम्हाकडेस चिठीचें उत्तर पाठवितील व इकडिल तपसिलें अर्थ तुम्हांस लिहितील. त्याजवरून समजेस पडेल. दिवस नाजूक आहेत. तेव्हां यावेळेस वरचेवर तुमचेकडून पत्र येऊन वर्तमान कळत जावे. राजश्री नानाचे चिठीचें उत्तर तुम्हांजवळ येतांच, तुह्मीं प्रविष्ट करावें, आणि इकडीलविसींचे प्रकारहि बोलण्यांत आणावें. फार काय ल्याहावे ? सारांष हेंच कीं, राजश्री बाळाजीपंतनाना यांचे जातीशीं एक विचार ठेविला आहेत. यांतच दौलतेचें कल्याण व उपयोग आहेत. जवळ फौज किती आहे, पेंच आंगावर कैसा, हें तुम्हांसहि समजोन आहे... ...ही दूर राजश्री बाळाजीपंत नानाच करितील. ही खातरजमा पक्की ठेऊन असें।. तेव्हां याचा बयान काय ल्याहावा ? तुम्हाकडून कोणते एक समजणें तें यथातथ्य समजावें. त्याजप्रों इकडूनहि घडेल. राजश्री नानाचे जातीवर कोणतेहि गोष्टीची काळजी न ठेवितां, निश्चिंत असो. फार काय ल्याहावें ? रा। छ २८ माहे रमजान. *सर्वात्मना लक्ष राजश्री नानाचे जातीकडे लागोन राहिले आहे. जेथें हिंमत आहे तेथें श्रीजी सर्व उत्तमच घडवील. राजश्री नानाहि दूरदेशे आहेत. व इकडीलविसीं त्याजला अगत्यावाद आहे. व भरंवसा ठेवितात. तैसाच येथील भाव आहे. याचा तपशील पत्रांत लिहिणें लागत नाहीं. सर्व तुमचे ध्यानांत आहे. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. मोर्तबसुद.