पत्रांक ४४५
श्री १७१८ फाल्गुन वद्य ५
सरकारचें पत्र जेः तुझी पेशजी एक दोन पत्रें सरकारांत पाठविलीं. त्यावरोन खातरजमेचीं पत्रें सरकारांतून पेंशजी रवाना केलींच आहेत. हाली तुह्मी
पत्रें सरकारांत व राजश्री रायाजी पाटील याचें नांवें पाठविलीं. त्यांस, पाटलाचे व सरकारचें पत्र परस्पर राजश्री धोंडीबा जामदार याचे मारफतीनें राजश्री कृष्णाजी सेटे याचे विद्यमानें मनन केलीं. त्यांत लिहिलें कीं: पहिल्या सरकारच्या पत्रांवरून लस्करांत यावयाची सिद्धताच केली होती. परंतु आग-याचे किल्याची बदनजर धरली, म्हणोन येथें कोणी समजाविलें. त्यांस लोकांनीं लहानमोठ्या चाक-या केल्या. त्यांस बक्षिस वगैरे मिळालें व आह्मी सरकार चाकरी आग-यास व मारवाडांत वगैरे केली व वरचेवर करित असतां, परिणामीं हरामखोरी बक्षीस प्राप्त जाहली. व फौजेतून निघाल्यास माघे दतियेवालें यांणीं एक दोन गांव खालशाचे मारले, त्यामुळें चैन पडत नाहीं. त्याचें पारपत्य करून, पुढें दोन महिन्यानंतर हुजूर यावयास आज्ञा पाहिजे. म्हणजे समक्ष विनंति करून कितेक निखालसतेच्या गोष्टी समजावीन. पुढे सरकारांतून करणें तें करावें. म्हणोन लिहिलें. त्यांस सैन्यांतून तुह्मी निघोन जावें, असा सरकारचा पेंच तुम्हाकडेस नाहींच. तुह्मी गेलो तेव्हां आग-याचा वगैरे बंदोबस्त सरकारांतून आलाहिदा करणें पडतो. ऐसीयासी, पहिल्यापासून सरकारचाकरी तुह्मी येकनिष्ठपणें केलीच आहे. त्याप्रमाणें आतां करावी. आणि हें पत्र पोहचलें म्हणजे तुम्ही खातरजमेनसी फौजेंत येऊन सरकारचाकरी पहिल्याप्रमाणें करीत जावी. येथें सरकारचाकरीच्या उपयोगाच्या माणसाचीच गरज आहे. तेथील वर्तमान वरचेवर कच्चें धोंडीबा जामदार व कृष्णाजी सेटे यांचे विद्यमानें सरकारांत लिहीत जावें. येथें फौजचा वेढा, तेव्हां परिणाम कसा लागेल ? तशांत, दरबारांत वशिला नाहीं, असे अंदेशे कराल, तर चिंता न करावी. येथून तुमच्या लिहिल्या अन्वयें पुरवणी होईल. आग-याचें कामकाज पहिलेप्रमाणें तुम्ही लस्करांत आला म्हणजे सनदा करून पाठऊं; व राजश्री देवजी मुकुंद यासहि तुमच्या जाण्यामुळें प्रतिबंध सरकारांतून केला होता तोहि दूर होईल. या लिहिल्याची खातरजमा ठेऊन लस्करात यावें. तुम्हाविसीं कोणी येथें हरएकविसी गैरवाका समजविल्यास येथें गैरवाका समजल्यांत येणार नाहीं. चिंता न करावी. म्हणोन पत्र.
परवानगी समक्ष कृष्णाजी व धोंडीबा जामदार, छ १७ रमजान, सन सबा.