पत्रांक ४४१
श्री. १७१८ माघ-फाल्गुन.
विशेष खबर, जमाशाहाची फौज लाहोरास आल्याची खबर आल्यामुळें तुह्मीं तावार लि।।. त्यास, सिखाची जमीयेत पहिल्यापासून भारी. व मुलूक सिखा-खालीं. तो येकदांच सोडून देऊन मार्ग देतील हें कसें घडेल ? गरमीचे दिवस जवळ आले. त्यापक्षी दिल्लीप्रांतें येऊन माघारें जाणेंयास बहूत कठीण. तेव्हां दिवस राहिले नाहीत, हाही आंदेशा आहे. दिल्लीप्रांतीं छावणी करी, तर वांचेल कसा ? ज्या गोष्टी मागें कधीं घडल्या नाहींत, तेव्हां आतां तर दुरोपास्थ आहेत. सबब कीं, तीस-पस्तीस पलटण आपलें व फौज व इंग्रज-नवाब-सुधा अनकूळ आपल्यास करून घेतात. हें पेशजी पामर साहेबासी तुह्मासी बोलणें जालेंच होतें. त्याचा मुलूक व जागा व दौलतीची रयासत, त्यापक्षीं त्यास काळजी कमी नाहीं. आपण मोह-यावरी. यामुळें तेच तुमची खातरजमा करून अनकूल होतील. तेव्हां, आपण घाबरे होऊन त्याच्या गळा पडूं लागल्यानें सुबिकी दिसेल, याचा अंदेशा तुह्मी करून बोलणें व्यर्थ व लिहिणें तें समजून बोलावें. खानासहि दिल्लीप्रांतीं सालमजकुरीं येतो ऐसेंच नजरेस आल्यास पकेपणें लिहिणें. तेव्हां श्रीमंताच्या कानावरी घालून पोख्तच पैरवी केली जाईल. तुम्हाकडील फौजेची तारंबल आहे, त्याची खर्चाची तजवीज करणें ते करणियांत येते. असें हाली पामरसाहेबास पत्र लिहिलें आहे. प्रविष्ट करून, उत्तर घेऊन पाठवावें. त्याचा आपला सरंजाम येकत्र होऊन मसलतीस पोहचल्यावरी, शाहाचा तो मजकूर किती आहे ? असो. येथील मोहिमेचें काम आटोपत आलें आहे. चिंता नाहीं. दुसरेः- यशवंतराव सिंदेयाविसी तुमच्या लिहिणेंयांत येतें कीं, अखेरसालपर्यंत त्याजकडे सालजाब असावा. ऐसियास, तुह्मास एकदोन वेळां पेशजी लि।। होतें कीं त्याजकडून पातशाहाची रजावंदी होत नाहीं. त्याच्या घरांत बंदोबस्त नाहीं. पैका तुह्मी घेतला असेल तर कर्ज घेतलें असेल, पातशाही खर्चाचे नेमणूकेतून यैवज घेऊन, पातशाहाच्या खर्चात कमती पडून, फायेदा व्हावा ऐसें तर केलेंच नसेल, त्यापक्षीं पातशाहास हैराण करणें ठीक नाहीं. यास्तव हुजूर बंदोबस्त करून, तुह्मास पत्रें लि।। आहेत. त्याअन्वयें येशवंतराव सिंदे यास तुह्मी ताकीद करून, येथील बंदोबस्त करून दिल्ह्याप्रमाणें खुलासा करून देवणें.