पत्रांक ४३१
श्री १७१८ माघ शुद्ध ४
सेवेसी सा। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल ता। माघ शु।। ४ जाणोन स्वकीय कुशल लिहीत गेलें पा। विशेष. राजश्री नारोपंत आवटी यांचा कारकून धरोन किल्यास नेला, ह्मणोन वर्तमान राजश्री चिंतो वामन देशमुखचे घरीं मशारनिल्हेकडील कारकून याणी सांगितलें. त्यावरोन देशमुखांनीं सांगितले कीं, दोही किल्ल्यांचा सरंजाम जप्त करावा, मागोन सनदहि देतों. याप्रों उत्तर झालें. त्यावरोन आवटी याजकडील कारकून यांणीं कोपरगांवास आवटी यांस लिहून पाठविलें. व रायगड वगैरे किल्ले येथील सिबंदी दोन हजार आणावयाकरितां जासूद पो. हें वर्तमान आह्मांस कळलें. त्यावरोन आपणांस लिहिलें आहे. तरी, मारनिलेचा कारकून धरून न्यावयास कांहीं समंध दिसत नाहीं की, कलीचें आकसांमुळें धरोन नेला असल्यास चिजबस्ताची पावती घेऊन कारकून यास सोडून द्यावें. यांतील कारण ह्मणाल तरी, आवटे यांची भीड यजमानांस किती आहे व अगत्य किती आहे, हें आपल्या ध्यानांतच आहे. त्याहीमधीं मशारनिले गैरसंधी कटकट करितात, हेंहि नाहीं. सरकार-सनदे-वरोन जें करणें ते करतात. त्यापक्षीं तुमचे आच्यारास दोष येईल. आपला पक्ष कमी आणी सारे कारभारी पाणी घेऊन उभेच आहेत. याजकरितां आपणास जें करणें तें सरकारांत विनंति करोन करावें, हें चांगलें. चुरस वाढऊन, कलागत केली असतां, यश येईल, असें कोणाचे विचारास येत नाहीं. येविसी राजश्री माहादाजीपंतांनी कच्चा मा।र लिहिला आहे. त्यावरोन ध्यानास येईल. सारांश, पुर्ता विचार चित्तांत आणोन, चांगले दिसेल तें करावें. गडकरी यांजकडे रा। यसोबा कळके याचा ऐवज यावयाचा, त्यांची यादी पूर्वी पो आहे, त्याप्रों रु।। पाठवून द्यावे. बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंति.