पत्रांक ४१९
॥ श्री ।। १७१८ मार्गशीर्ष वद्य १३
मसुदा सरकारचे ताकीद द्यावयाचे डिल्लीचे सुभादार येशवंतराव सिंधे यास ताकीद लिहावेयाचेः–काशीरामराय, कमळनयन मुनसी नि।। सरकार याचे पुत्र, कासीराम यास डिल्लीचे सुभाचे मुनिसीगिरी मोकरार जाहला आहे. तेथील लिहिणें-पुसणें वगैरे जाबसाल त्याजकडून घेत नाहीं, म्हणून कळलें, आणखी दुसरे चुनीलालकडून लिहिविता म्हणून समजलें. जें लिहिणें, फारसीचें लिहिणें काम काय असेल तरी सरकारचे मुनसीशिवाय दुसराकडून न घेणें. तुह्माकडील चुनीलाल यास बरतर्फ करणें. तो पहिला गुमास्ता त्या जवळ होता. हाली मुनसीसहि चुनीलालासहि बनत नाहीं, यास्तव तुह्मी त्यास बरतर्फ करणें. फारसीचें लिहिणेंचें जे कारभार असेल तरी कासीराम मुनसीचे हातीं घेत जाणें. कासीराम मुनसीस दरमहा रुपये ५० पन्नास देत जाणें, हे रोजमराबाबत रुपये पाछाई सुभेत खर्च मुजरा आहे. दर शेकडे रुपया .।।. आठ आणेप्रमाणें पादशाई सुभेचे मुनसीस तहरीर पादशाई महलाची आमदानीवर मोकरार आहे. हरयेक अमील यास ताकीद करून, हे रुपये कासीरामास देवित जाणें. या गोष्टीचे तकरार न होणें. याजविषई फिरियाद सरकारांत येऊं न देणें. आणि हरसहाय ह्मण्णार कमलनयन मुनसीचे नातू आहे, त्यास डिल्लीचे तैनांत महंमदीखान पलटण आहे त्या पलटणाचे फारसीचे सिरस्तदारी सांगितले आहे. तरी पलटणचे शिरस्तेचें कामकाज हरसहाय याजदून घेणें. यास रोजमरा मागला सिरस्तदारीचा यास देणें. कदीम सिरस्तदारास बरतर्फ करणें. याजविषई खानमजकुरास ताकीद करणें, दुसरेचे हातें एकंदर काम पारसीचें न घेणे. कासीरामाचा राजीनामा पाठविला आहे. फिरून बोभाट न ये तें करणें.
सारांश पाहून दोन पत्रें लिहावीं. छ. २७ जमादिलखर, सबा तिसैन.