पत्रांक ४१८
श्री. १७१८ मार्गषीर्ष वद्य ६
श्रीमंत राजेश्री बाबासाहेब साहेबांचे शेवेसीः-
आज्ञाधारक यशवंतराव व अमृतराव सिंदे कृतानेक रामराम विज्ञापना तागाईत छ २० जमादिलाखर मुकाम दिल्ली साहेबांचे कृपावलोकनें करून वर्तमान यथास्थित असे. विशेष. पेशजी आज्ञापत्र पाठविलें त्यांत आज्ञा कीं श्रीमंत राजश्री बाजीराव साहेब पंत प्रधान यांच्या व आपल्या भेटी जाहल्याचें वर्तमान लिहोन अर्जी हरजत पन्हा यासी पाठविली आहे. त्यास, तुम्ही हे अर्जी हुजूर गुजरून, याचे जबाब जलदी पाठऊन देणें; म्हणोन त्यावरून अर्जी व आज्ञापत्रें येथें येऊन पोचतांच, आशेप्रमाणें अर्जी हुजूर गुजरून प्रत्योतराचे शुक्याबदल अर्जी केली. तेव्हां शुके लिहावयाचा हुकूम होऊन आज शुके लिहिले. तयार करून सेवेसी पाठविले आहेत. साहेबाचे नांवें एक शुका, व श्रीमंत राजश्री बाजीरावसाहेब पंतप्रधान यांचे नावें येक शुका, व श्रीमंत राजश्री नाना फडणीस यांचे नांवे येक, ऐसें तीन शुके हुजूरून लिहिले ते हालीं डाके समागमें रवाना करून दिल्हे आहेत. प्रविष्ट जाहल्याचें प्रत्योत्तर द्यावयासी लेखन आज्ञा जाहली पाहिजे. यानंतर इकडील वर्तमान घेण्याचें पुण्यप्रतापेंकरून सर्वहि यथास्थित आहे. आम्ही अहिर्णिसीं हजरतपन्हाचे खिजमतींत हाजर राहोन, मुरशदजादे आदिकरून सर्वांचें तबीयतींत किंचितहि नाखुष न होऊं पावे अशी चौकशी क्षणक्षणा करून, सरकारसेवेच्या लक्षें हरयेकविशीं कामकाजाचा बंदोबस्त राखोन आहों. चाकरीची बूझ करून सांभाळ करणार घणी समर्थ आहेत. येथील किल्यांत किलेदारीचा जिमा गुदस्तापासून रा। मानसिंग गौतम यांचा होता. सांप्रतकाळीं मा।र्निल्हेचे चित्त सरकारचाकरीचे ठायीं कंपेश दिलगीर, ऐसे राजश्री जगोबाबापू यांस समजल्यामुळें, किलेदारीच्या सनदा आमचे नांवें करून पाठविल्या. त्या कालच आम्हांकडे येऊन पोचल्या. एका दो रोजांत किलेदारीची दखल घेऊन, किल्यांतील बंदोबस्त चौक्या पाहारे व दिली दर्वाजे वगैरेचा बदस्तुरी चालत आहे, त्या अन्वयें करून मागाहून सेवेसी विनंतिपत्र लिहोन पाठवितों. बहुत काय लिहूं ? कृपा निरंतर केली पाहिजे. हे विज्ञाप्ति.