पत्रांक ४१७
श्रीगजानन प्रा। १७१८ मार्गशीर्ष शुद्ध ७
पे।। सामरचे बंदोबस्ताविषई सरकारचीं पत्रें.
१ बुंदी व कोठेवाले यांसी कीं, बणजारा बेपारी तुमचे प्रांतांतून मिठाचे भरतीस जातात. सां।. पे।। सामर येथील कारकून तेथें राहून बेपारीयांची पेट करून सामरेस भरतीस पाठवावे, आणि सागरेखेरीज नावा पंचभद्राकडे मिठाचे भरती करून येतात त्यांजपासून फौजदारीचा हासील लागतो तो घेतात. ऐसें चालत आलें असतां, सालमजकुरी दोबस्त बणजारा मारवाडवाले यांच्या बंदरास पाठविले, सामरची फौजदारी घेऊं दिल्ही नाहीं, ह्मणोन विदित जालें. ऐसियासी, ये गोष्टीनें सरकार-नुकसान ध्यानास न आणितां, कादारास न मानून बखेडा करतां, तरी, इतःपर तुह्मीं बेपारी सामरेकडे भरतीस जाऊ न दिल्यानें पा। मारचे जमेंत कसर होऊन, त्याचा जाब तुह्मांस करणें लागेल, ऐसें समजोन सरकार अमलापासून वहिवाट चालत आल्याप्रमाणें चालवणें. फिरोन बोभाट येऊं न देणें.
१ लालाजीबावास पत्र ऐसें कीं, बुंदीकोठेवरून बणजारा बेपारी मिठाचे भरतीस जातात. त्यांस सामरेकडे जाऊं न देतां, मारवाडवाले याच्या बंदराकडे पाठविले. सामरेखेरीज भरती येते त्याजपासून फौजदारीचा हासील पो मा।रचा कारकून माणसें संस्थानमा।रीं असतां त्यास घेऊं न दिल्हा. रांगड्याकडून सरकार-अमलासी दिकत जाली. तरी तुह्मी त्यांस ताकीद करून सुरळित चालवावा, ऐसें न होतां, तुह्मांकडीलच कारकून रांगड्याचे तरफेचें बोलणें बोलतात. ऐसियासी, बेपारी कोणी सामरेकडे न पाठविला आणि फौजदारीचे हासीलांत दिकत केलीयानें पो मा।रची जमा कैसी बसते, हें तुह्मीं ध्यानास न आणल्यानें सरकार-अमलांत सालमा।रीं बखेडा जाला, ह्मणोन विदित जालें. त्यास, अतःपर फौजदारी वगैरे सरकारअमलापासून चालत आल्याप्रों हाली न चालल्यास सरकारनुकसानीचा जाब, ऐसें समजोन फौजदारी हासीलाचे वगैरे सुरळित चाले तें करावें. फिरोन बोभाट न ये तें करणें.
* सदरहूचा सारांश पाहून पत्र द्यावें. छ ६ जमादिलाखर सबा तिसैन, मेघशामराव जमे बक्षी.