पत्रांक ४११
श्री १७१८ कार्तिक वद्य ४
राजश्री दौलतरावबाबा गोसावी यांसीः-
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। अलीबहादूर रामराम विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत असले पाहिजे. विशेष यशवंतराव नाईक निंबाळकर यासी व वाघेले यासी लढाई जाली. नाईक सरकारकामास आले. त्यास, इकडे आपणाकडील फौज आहे. त्याजला ताकीद कुमकेविसी यावयाविशई पूर्वी सविस्तर लिहिलेंच आहे. त्यास, राजश्री जगन्नाथराम व आंबाजी इंगळे यांचीं पत्रें आह्मांस आलीं कीं, राजश्री माधवराव फाळके व पलटणें आह्मी कुमकेस पाठविलीं आहेत व आह्मीहि येऊन पोहचतों. ते येऊन पोहोचले ह्यणजे मोठीच गोष्ट जाली. त्यास आह्मांस आपल्याकडील भरवसा याप्रमाणेंच होता. त्याप्रों या समयीं द्दिष्टीस पडला. पूर्वापार स्नेह चालत आला आहे तोच लोभ आपण राखितील. त्यास, आह्मांकडील पुरावा करावयाची काळजी आपणांस असत जावी. रा। छ १७ जमादिलाखर, बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंती.