पत्रांक ४०९
श्रीपांडुरंगायनमः १७१८ कार्तिक शुद्ध ८
राजश्री रघुनाथराव भोंसले गोसावी यासीः--
सकलगुणालंकरणअखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य रो।।
दौलतराव सिंदे रामराम विनंति उपरी येथील कुशल ता। छ ७ जमादिलावलपर्यंत मुक्काम लस्कर नजीक ग्वालियेर, येथें येथास्थित जाणून स्वकीय कुशल लेखनीं संतोषवीत असावें. तदनंतर अलीकडे पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. तरी, सदैव पत्रीं संतोषवीत असावें. यानंतर, किले जापानिर येथील महालासमीप आपल्याकडील फौज आपल्या माहालानिहायच्या बंदोबस्ताकरितां येऊन पडली आहे. तेव्हां इकडील किलेमा।रचे माहाली गावगन्ना कहीकाबाड व घासदाणा वगैरे उपसर्ग लागतो, ह्मणोन समजण्यांत आलें. ऐसियास, परस्पर पूर्वापार स्नेह. त्यापक्षीं तिकडील महालाचा बंदोबस्त होऊन इकडील मोहालीं उपसर्ग लागणें, हे अयुक्त. येविषई निक्षून ताकीद होऊन इतःपर इकडील माहलची तसनस न होय तें व्हावें. तेणेंकरून इकडूनही तिकडील माहलीं उपसर्ग व्हावयाचा नाहीं. घरोब्याचे ठाई पुरवील चालींत न्यन नसावें. ह्मणजे, स्नेहाची वृद्धी, पुरवीपासून अद्वैत, त्या अन्वयें उभयपक्षीं चालींत अंतर नसावें, हें स्नेहास चांगलें. बहुत काय लिहिणें ? लोभ असावा हे विनंति.