पत्रांक ४०२
श्री १७०८ आषाढ वद्य ५
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिवदीक्षत वाजपेय याजी स्वामींचे सेवेसी. विद्यार्थी बाळाजी जनार्दन कृतानेक सां नमस्कार, विनंत उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोष जाहाला. वरकड मजकूर व उभयेतां चिरंजीवाचे वेतनाविसीं लिहिलें तें कळलें. ऐशास, वेतनाचा ऐवज सोईसोईनें पावेल. आह्मी बदामीचा किल्ला घेऊन, तेथील बंदोबस्त करून, राजश्री हरीपंत तात्या यांस फौजसुधा करनाटकांत छावणीस ठेऊन, आह्मी पुण्यास आलों. नंतर हरीपंत तात्या गजेंद्रगड घ्यावयाकरितां गेले, तों किल्लेकरी यांणीं दहषत होऊन कौल घेऊन खालीं उतरले, किल्ला फते जाला. त्याजवर अदवानीकडे टिपूची फौज येऊन महसरा बसला. हें वर्तमान येतांच, चिरंजीव राजश्री आपा बळवंत व राजश्री बाजीपंत अणा फौजसुधा पाठऊन, कुमक करून, महासरा उठविला. तुंगभद्रेस पाणी येईल याजकरितां फौजसुधा अलीकडे आले, तों दुसरे दिवसीं पाणीहि नदीस आलें. सारांश, श्रीमंताचे पुण्यप्रतापेंकरून शत्रूवर जरब बसून फौजा अलीकडे आल्या. आपल्यास कळावें याजकरितां लिहिले असे. रा। छ १९ रमजान. * बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति,