पत्रांक ३९८
श्री. १७१८ ज्येष्ठ वद्य ३
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सदासिवपंत अभ्यंकर स्वामीचे शेवैसी.
पो बाळाजी जनार्दन सां नमस्कार. विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदासिव दीक्षित वाजपेय यांजकडे सालाबाद सातारियाहून नेमणूक पानसुपारी व दिवटीचें तेल व भाजी व मशालेचे पोत व शाई येणेंप्रमाणें चालत आहे. त्यास भाद्रपद मासापासून आलीकडे चालत नाहीं ह्मणोन दीक्षितांनी लिहिलें. ऐशास किरकोळ कामाचा बोभाट नसावा. सा। पानसुपारी शाकभाजी वगैरे सदरहू प्रों सुदामत चालत आल्याप्रमाणें यांजकडे देत जाणें व सातारियाचे पोतापैकीं वर्षासन दीडशें रुपये पावतात ते सन आर्बापासून पावले नाहींत ह्मणोन कळलें, ऐशास यांच्या वर्षासनाचा ऐवज दीडशें रुपये प्रों सन आर्बा व खमस व तीत तीन सालाऐवज यांचा वर्षासनाचा राहिला असेल तो देणें. रा। छ १७ जिल्हेज. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.