पत्रांक ३८७
॥ श्री. ॥ १७१६ माघ शुद्ध ५
राजश्री दवलतराव-बाबा शिंदे गोसावी यांसीं:--
छ अखंडित-लक्ष्मी-अलंकृत राजमान्य गंगाभागीर्थी अहिल्याबाई गाइकवाड मु।। देवळाली प्रो नाशीक विनंति विज्ञापना येथील कुशल ता। माघ शुद्ध ५ पावेतों आपले कृपा-अवलोकनेंकरून यथास्थित असों. विशेष. आमचें वर्तमानः आमचे धणी कैलासवासी जाले नंतर मानाजीराव गायकवाड यांनीं पंचवीस-तीस लक्षाचें * वितें घरांत होतें तें दरोबस्त लुटून नेलें. आह्मांस एक वस्त्रानसीं एक घर लहानसें होतें तेथेंच टाकीत ठेविले. आण मानाजीराव देवलकास गेले. तदनंतर गोविंदराव गायकवाड आले. त्यांनीं येतांच प्रथम आमची खायाखर्चाची नेमणूक दाहा हजाराची होती ते बंद केली आण घरास खणतें लाऊन एक लक्षाचें वितें नेले. मग तेथें आमचे चुलते नारोजी देशमुख होते त्यांजपाशी आह्मी डागिने चवलक्षाचे ठेविले आण आह्मी श्री मार्तडाचे दर्शणास जेजुरीकडे निघालों. आमचे मागें देशमुख मजकूर यांनी गोविंदराव-बावास सांगून डागिने चवलक्षाचे त्यांस दिल्हे आण आपण मामलत करून गेले. आह्मी ये प्रांतीं आलों. तेव्हां आह्मांस वारीस एक श्रीमार्तंड किंवा आपण आहेत यास्तव विनंति लिहिली आहे. तर, आमचा बंदोबस्त करून देविला पाहिजे. आह्मीं भेटीस यावें, तर येथें आम्हांस खर्चाची आबळ आहे, यास्तव हें पत्र लिहिलें. आपण गोविंद राव बावास ल्याहावें. आमचे धण्याचे हातची नेमणूक आहे ते आह्मांस देवावी. व हाली रावबा पुणें प्रांतीं येणार आहेत. त्यांजलाही ताकीद करावी, दुसरें: नारोजी देशमुख यांचे साठ गांव आहेत, त्यांतून तीस गांवांवर आपण जप्ती पाठऊन, आपण आह्मांस हात उचलून खायाखर्चास द्याल, त्यांत आह्मीं राजी आहों. आपण बहूतांचें पालन केले तैसें आमचें केलें पाहिजे. विनंतीपत्र लिहिलें आहे. हें उदास न करावी. दुसरें: आमचें धण्यास एकशेंसाठ बायका होत्या. त्यांत चौघी खाशा. गोविंदराव गायकवाड यांणीं बायका दरोबस्त काढून दिल्या आण आमची चौघींची हे गते केली. हें वर्तमान सेवेसी विनंती लिहिली आहे. तर, आमचा बंदोबस्त करून दिल्हा पाहिजे. आमचे धण्यानीं कोट्याणकोट पैका असोन, त्यांचे देऊळ कोणें बांधलें नाहीं, हें आपल्यास श्रुत होये. आपण पाटिलसाहेबाचे पोटी कुलदीप आहेत. मी धर्माची बहीण जाणेन, हें कार्य केले पाहिजे. आण हें न जाल्यास आपले पायापाशीं बोलाऊन घ्यावें. आपण शेर पीठ द्याल तर खाऊन बसूं. यादो भास्कर यांणी सर्व बंदोबस्त करून, घरोघर लाविले. दमाजीबावाचे हातचे दोनच्यार गांव पाटिलकीचे आहेत, त्यांत सर्वपरी काल यात्ता आहे, आमचें कोठें चालू देत नाहींत. आह्मांस पत्रें आणून दाखवितात कीं, आम्हांस धण्यांनीं सांगितलें. मग खरें किंवा खोटें हें नकळे. त्याजमागें मानाजी बावाचे वेळेस वाण्यांनीं उपसर्ग दिल्हा. त्याजमागें आतां तर परभूमयेच जालें. सर्व कारभार सोडून बायकांस लुटितात. सेवेसी श्रुत होय. हेतूप्रमाणें भरवसा जाणून, हें पत्र कोण्हास न दाखवणें आण उत्तर पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें ? हे विज्ञापना.