पत्रांक ३७५
श्री. १७१४ अखेर
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री आबा स्वामींचे सेवेसीं:-
पो बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें विशेष. वेदशास्त्रसंपन्न राजश्री बापूभट घारपुरे यांणीं श्री हरीहरेश्वर महादेव याचें नवीन देवालय जनस्थानीं बांधिलें आहे. त्यास देवाचे पूजा नैवेद्य व नंदादीप वगैरे खर्चास कुलबाब व कुलकानू कमाल आकाराचा गांव च्यारसें रुपयांचा नुतन इनाम पा। नासीक अगर पा। वणदिंडोरी या माहालांत श्रीमंतांनीं देविला आहे. त्याची सनद अलाहिदा तुमचे नावें आहे. त्यास, सनदेप्रमाणें गांव भटजीचे दुमाला लौकर करावा आणि लेहून पाठवावें. त्याप्रमाणें इनामपत्रें करून देवऊं. पत्र पावतांच आधीं हें काम करावें. कमाल* आकार याप्रमाणेंच हाल वसूल व खटपट केलीयास शें पन्नास रुपये अधिक होत असेहि गांव असतात. या रीतीचा पाहून लौकर नेऊन द्यावा. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.