पत्रांक ३७२
श्री १७१४ अखेर
विज्ञापना. मीर अबदुल कासम याचे रवानगीचे वेळेस मषीरुलमुलूक यांणीं गोविंदराव उभयतां यांस बोलाऊन मजकूर सांगितला कीं: मीर साहेब यांजला रवाना करीत आहोंत. त्यास, त्याचे चित्तांत अंदेशे कित्तेक आले आहेत. रा। तात्या येथें आहेत. त्यांचा यांचा बहुतसा परिचय नाहीं. यास्तव तुह्मीं त्यांची खातरजमा करावी. रा। तात्यास पत्रें लिहून द्यावीं. पुणेयास मदारुळमाहाम यांचीं पत्रें आणवावीं कीं मीरसाहेब यांसीं दुसरा अर्थ नाहीं. रा। तात्यांही दुसरा अर्थ न धरावा. आपल्या सल्लेस जी गोष्ट येईल त्यांचा इतल्ला यांजला करीत जावा. यांजला प्रसंगोचित मा।र चांगला आढळून येईल तो येऊन अर्ज करितील. लिहिणार शाहाणे, बोलणार चांगले आहेत. याप्रो पत्र आणवितों ह्मणोन त्यांची खातरजमा करावी. ह्मणोन सांगून, बाहादूर उभयतां गोविंदराव, मीर अबदुल कासम यांचे घरीं आले, त्यासीं बोलणीं बहुत जालीं. त्यांची खातरजमा केली. पत्रें देतों व स्वामीचीं पत्रें पुणेंयाहून आणवून देतों, ह्मणून बोलले. कर्नाटकप्रांतींच्या यादी निवडून काढिल्या आहेत. त्या रा। रायांस बोलाऊन वाचून दाखविल्या. त्यांची फारशी करून मीर साहेबांबरोबर दिल्या. इतकें बोलणें होऊन चंपी कलवंतीण तेथें आली होती, ते गोविंदराव भगवंत यांजपाशी बोलत होतीं कीं, रंभाजी बाजी याजला आशु-याकरितां येथें बोलाऊन घ्यावें. त्यास बाहादूर यास चंपीनें व गोविंदराव भगवंत यांणीं मा।र पुसोन घेतला. त्यास हुजुरांत अर्ज करून सांगू म्हणोन बाहादूर यांणीं उत्तर केलें. उपरांत बाहादूर उठोन गेले, मीरसाहेब यांणीं उभयतां गोविंदराव यांची ज्याफत केली.
गोविंदरावकृष्ण गोविंदराव भगवंत
१ शिरपेंच १ पागोटें
५ शालजोडी किनखाप १ शालजोडी
जामेवार काशीचा १ किनखाप
दुपट्टा, पागोटें, विजार २ जामेवार शेले.
---------- ----------
६ ५
येणें प्रो देऊन रुकसत केलें. त्यास, जाहाला मा।र तो लिहिला आहे. उभयतां काय लिहिणार ते लिहोत. हे विज्ञापना.