पत्रांक ३६८
श्री १७१४ आषाढ वद्य १०
वेदशास्त्रसंपन्न राजश्री सदाशिव दीक्षित वाजपेययाजी स्वामीचे सेवेसीं:--
विद्यार्थी बाळाजी जनार्दन सां नमस्कार विनंति येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. आपणाकडून ज्येष्ठ शुद्ध येकादशी व आषाढ शुद्ध चतुर्थीची पत्रें आलीं तीं पावलीं. लिहिला मजकूर कळला. राजश्री कृष्णराव अंबीकर यांचे पथक सातारीयांत चाकरीस आहे. त्यांतील स्वारांनी गुदस्ता श्रावणमासीं आमचे वाड्यांत येऊन रात्रौ मारामार केली. खिजमतगारास तोडलें व माहातास मारलें. अशी आगळीक केली. याचा जाबसाल त्याणीं करावा तो अद्याप केला नाहीं. येविसीचा विचार आपण केला पाहिजे. व आंबे याची डाली येक पाठविली आहे घ्यावी. म्हणेन लिहिलें. ऐशियास, आपलें पत्र आलें, त्यावरून राजश्री सदाशिवपंत अभ्यंकर यांस अंबीकरास ताकीद करून ज्यापासून आगळीक जाली असेल त्याजकडून आपणाकडील माणसाची समजूत करवावी ह्मणोन लिहिलें आहे. ते करवितील. आंबेयांची डाली एक पाठविली ती पावली. * रा।। छ २२ जिलकाद. लोभ असों दीजे. हे विनंति.
पौ आषाढ वद्य १४, परिधावी सां।.