पत्रांक ३६७
श्री रामोजयति. १३१४ चैत्र शुद्ध १०
राजश्रियाविराजित राश्रमान्य राजश्री गणेशपंत दादा स्वामी वडिलांचे सेवेसीः--
पोष्य राघो आपाजी कृतानेक सां नमस्कार विनंती उपरी येतील कुशल जाणोन स्वकीये लिहित गेलें पाहिजे. विशेष. आह्मीं लष्करांत यजमानासमागमे गेलों होतों, त्यास रविवारीं सायंकाळीं नांदगांवास आलों. त्यास, आपले भेटीस सत्वरच येतों. पुणियाचे मुक्कामीं आपले व राजाचें बोलणें जाहलें. राजे तेच आपण आहेत. त्याजवरून आह्मांस राज्यांनीं माघारें रवाना केलें आहे. तर म्हसवड संबंधें पेशजीपासून बोलणें आहे. गुदस्तांहि बोलणें जाहलें त्याजप्रमाणें आपण निभावणी करून घेतली. बाकी बोलण्यापैकीं बाकी राहिली आहे, त्यास, भेटीनंतर फडशांत येईल, हाल्लींचेहि बोलणें आहे. त्यास, आल्यानंतर आपले विचारें होणें तें होईल. आम्हांस भाऊ आपण म्हणविल्याचा अभिमान सर्वप्रकारें आपणांसच आहे. तेथें लेहून कळवावें ऐसें नाहीं. म्हसवडाविषयीं आतां नवीन काहीं घालमेल न करावी. मुदाम यजमानांनीं आपलेकडे पाठविलें आहे. आणखी कितेक बोलणीं आहेत, समक्ष बोलणें होईल. येविषयीं राजश्री तात्या स्वामींसही विनंति करावी. आह्मी पदरचे आणि राज्याविषयीं सर्व प्रकारें अभिमान आपणास उभयतां आहे. त्यापेक्षां कोणताही अर्थ दुसरा नाहीं. वचनें दिल्हीं तीं रामबाण आहेत. आतांच येतों. परंतु स्वारीचेमुळें उष्णाचा उपद्रव जाहला. त्यास, प्रकृतीस ठीक नाहीं. कांहीं स्वस्थ जाहल्यावर लवकरच येतों. दादा ! भाऊ म्हणविल्याचा अर्थ आपण शेवटास न्यावा. काम काज होणें तीं होतील. राज्याचे अभिमानी आपण. त्यापेक्षां आह्मी ल्याहावें, ऐसें नाहीं. पत्राचें उत्तर द्यावें म्हणजे दोन रोज आज्ञेप्रमाणें राहुन येईन. नाहीं तर, तैसाच येतों. कळावें, बहुत काय लिहिणें ? लोभ करावा हे विनंती.
पैवस्ती छ ९ साबान ईसनै तीसेन.