पत्रांक ३६२
श्री व्यंकटेश प्रा।. १७१३ श्रावण वद्य २
पो छ १४ जिल्हेज
इसने तिसैन
स्वामीचे शेवेसीं. विनंती. भुजंगराव अण्णाजी कृतानेक सां। नमस्कार विनंती येथील कुशल तागायत आषाढ वद्य ७ पावेतों स्वामीच्या कृपावलोकनें करून यथास्थित असे. विशेष. इकडील वर्तमान लिहून लाखोटा बागेवाडीकर सुभेदार यांच्या विद्यमानें पाठविला होता. शेवेसीं प्रविष्ट होऊन मजकूर विदित जाहला असेल. आज पावेतों त्रिवर्गाचें शैन्य पटणासमीप होतें. सांप्रत पर्जन्यकाळ आला याजकरितां, उभयतांनीं कार्याकारण पायचे लोक फिरंगीयाचे हमराहा करून; फौज घेऊन, माघारे चित्रदुर्ग व गुती या पट्टीस छावणीस येणार. टिपूसो आजपावेतों किल्ल्यांत होता. तो, किल्याबाहेर उभयकावेरीमध्यें दोन पेठा आहेत, त्या दरम्यान येऊन उतरला आहे. तहाचें बोलणेंहि लाविलें आहे, ह्मणे, या प्रकारें कोणी कोणी तिकडून आलेले गृहस्थ तहकीक वर्तमान ह्मणोन सांगतात. परंतु लष्करची व मुख्यमुख्य स्थलची बातमी पुण्यास येऊन परभारें स्वामीस विदीत होत असेल. त्यांत लिहिलें येईल तें खरें. येथें ऐकिलेलें शेवेसीं विनंती लिहिली आहे. मुख्यापर्यत आह्मांकडूनही तीन प्रतीचीं पत्रें व माणसें गेलीं आहेत. त्यांतून एकहिपुनरागम नाहीं. तात्या साहेब ! पूर्वी कोण्ही एक्या पादशहाने कृपावंत होऊन एक्या ग्रहस्थास समुद्राच्या लाटा मोजून आणणें बद्दल शेवा सांगितली, ह्मणो। याचा अन्वयें माझ्या उमेदीसही शेवा योजून मुख्य स्थळाहून प्राप्त जाहली. तेव्हां दैवाची परिक्षा समजावी. आतांचा प्रसंग पाहतां, आमच्या हातून कार्य सिद्धी घडून स्वामीची व यजमानाची कृपा संपादणे उघड दिसत आहे. त्यांतहि श्रीहरीच्या चित्तीं काय आहे नकळे! कोणत्याहि जातींत एकवेळ जिवाहून अधिक चाकरी करून पुत्रपौत्रास अन्नास ठिकाण करितात. अस्मा दिकांच्या जातीस वारंवार बशर्त चाकरीवर कृपा व्हावी ऐसें ठरले. असो ! योजिल्या प्रमाणें सरकारचाकरी घडल्यास सत्वरींच स्वामीचे पाय पाहतों. नाहींपक्षीं कृपेची वृद्धी असावी. अंवदा कनोंटकांत फौजा गेल्यामुळें श्रीमंतांच्या नावाप्रमाणें कार्य तो सिद्धीस गेलें, व बहुत लोक, गतराज्य व ग्राम व उद्योगागत व नूतन संपादन श्रीमंतांस कल्याण चिंतून खुशाल आहेत. आह्मींहि त्याहून अधिक चित्तांत आनंद मानून, रात्रंदिवस स्वामींच्या पायांचें स्मरण करीत, या ग्रामांत कुटुंबसुद्धां आनंदेंकडून आहों. स्वामीची कुपादृष्टि पूर्ण असावी. मीहि एक वचनाचा दास स्वामीचा आहें. विसरूं नये, ही विनंती उभयतांसहि मिळून आहे. लोभ करावा. हे विनंती.