पत्रांक ३६१
श्री व्यकटेश प्रा।. १५१२ ज्येष्ठ वद्य १०
पो छ २१ जिल्काद, इसने तिसैन.
स्वामीचे शेवेसीं. विनंती पोष्य भुजंगराव अण्णाजी सां। नमस्कार विनंती उपरी येथील कुशल ज्येष्ट वदि १० पावेतों स्वामींचे कृपेंकरून यथास्थित असे. विशेष. अलीकडे स्वामीकडून कृपापत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. येणेंकरून चित्त सापेक्षित आहे. तर, सदैव कृपापत्र पाठऊन सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. इकडील वर्तमान पेशजी स्वामीकडून माणसें आलीं होतीं त्याजबा। विस्तारें लि।। आहे. विदित जाहलें असेल. बागडकोटेस तीर्थरूप आनंदराव आहेत. त्यांचें पत्र आलें होतें. त्यांत दक्षिणेकडील वर्तमान होतें जेः टिपूसो नागमंगळावर होता. त्यास साहा कोसांचे अंतरानें इंग्रज व मोगल उतरले होते. यांजवर छापा घालावा म्हणून तयार होऊन येत असेतां, उभयतांस वर्तमान कळून, हुषारीने बुनगें माघें देऊन, पुढे सडे होते. यांची त्यांची गांठ पडून दोन प्रहरपर्यंत गोळागोळीने लढाई जाहली. उभयपक्षीं लोक फार जाया जाले. टिपूसो सवेंच निघून पटणास दाखल जाहला. त्यानंतर, हेहि जाऊन लागलीच कावेरी पार होऊन शहर गंजम येथें उतरले आहेत, ह्मणोन वर्तमान. आणि कोणी कोणी म्हणतात जे, पटणास मोर्चे लाविले आहेत ह्मणोन, पटण घेतलें, टिपूसो सडे पळून गेला ह्मणोन. असें तिकडे अनाहूत जालें आहे. ह्मणोन वर्तमान ऐकिलें ते शेवेसीं लि।। आहे. यांत खरेंलटकें स्वामीस पुण्याहून बातनीचें वर्तमान येत असेल त्या अन्वयें पाहावें. एकूण तूर्तच्या प्रसंगीं तिकडील तों असे आहे. हेंच शाश्वत राहोन परिणामी भटी नीट उतरली पाहिजे. राजकारण कोण्या थरास जाते पाहावें. स्वामीस सैन्याहून व पुण्याहून तहकीक वर्तमान येत असेल. तपशीलवार लिहून पाठवावें, व इकडूनहि माणसें गेलीं आहेत. अद्यापि फिरलीं नाहींत. येतांच तहकीक वर्तमान कळेल. त्याप्रों शेवेसी विनंती लिहीन. अवंदा नवरा व नवरी दोन्हीं चित्ताप्रमाणें मिळालीं नाहींत. याजकरितां लग्नें राहिलीं. पुढें ऋणानुबंध सर्वाविशीं स्वामीचे पाय आधारभूत आहेत. विशेष लिहिल्या उपरोध दिसेल. क्रिया केवळ उत्तम. सर्वज्ञाप्रति बहुत काय लिहिंणे ? लोभ असो दीजे हे विनंती.