पत्रांक ३६०
श्रीव्यंकटेश प्रा।. १७१३ ज्येष्ठ
शेवेसीं सा नमस्कार विनंती ऐसीजे. ती।। रा। आनंदराव बागलकोटेस आले आहेत. म्हणोन ऐकिलें आणि आपणासहि पुणेहून कळून लिहिलें. त्यांनी आपल्या महत्वाकरितां बागलकोटेस राहून दक्षणेकडील बातनी पुण्यास रास्तेकडे लिहून पाठवीत असतात. त्यांत, मी पुणेस जात असतां मध्यें स्वामीकडूनच फिरोन आलों. त्याजवरून कयासानें लिहिलें असेल. आह्मीं तेथून आल्यावर कोणासहि भाषणांत आणिलें नाहीं. त्याचें लक्षणें नाहीं. ते संभूती उठऊन थोरथोरांमध्ये विक्षेप पाडावा हें पूर्वीपासून. त्यांत स्वामीची कृपा माझे ठाई आहे. त्यास, हरप्रकारें रास्तेस लिहून पाठऊन त्यांत व आपणांत पुन्हां विक्षेप पाडावा, त्यायोगें मी स्वामींच्या पायांपासून दूर व्हावें, ही कवायत पुष्कळ भरले आहे. सर्वहि स्वामींच्या ध्यानांत असों द्यावें. मी बहुत सावधगिरीनें वर्तणुक करितों. स्वामींचे बोलणें किंवा लेख प्राणहि गेल्यास इतरांच्या दृष्टीस अथवा कर्णास स्पर्श होणार नाहीं, ही खातरजमा असावी. यांचें निदर्शन दिवसें दिवस कार्यावर समजत जाईल. हें पत्र आपण मनन करून सर्वच विसर्जन करावें. टिपूसाचें वर्तमान बेंगळुरापलीकडे झाडींत मागडीचा किल्ला आहे. तेथें सरंजाम ठेऊन, आपण पुढें करेशाकरशांत, गीबिले शावंतगी म्हणोन पाहाडी लोक आहेत त्यांचे आसरियानें जबरदस्तीनें आहे. तूर्त मात्र, इकडील फौजा पटणपर्यंत जाऊन लूट करून घेऊन येतात. एंवदा प्रर्जन्यकाळीं कांहीं दम असल्यास उपद्वयाप करील. सोडणार नाहीं. केवळ तो यासमई बुडालासारिखा आहे. परंतु, परिणामास जी गोष्ट उतरेल ती खरी. अंतरंगचा भाव इंग्रजासीं स्नेह करून घेऊन, उपरांतीक इकडील समाचार घ्यावा, या याचनेत आहे. येविशीं इंग्रजांशी जाबसाल फरांसिसांचे विद्यमानें विलायतींत लिहून पाठविला आहे, ह्मणोन कोणी कोणी तिकडील पक्षाचे बोलतात. सर्व निदर्शनास येईल तें खरें. आम्हाकडूनहि माणूस गेला आहे. त्याचें काय उत्तर येतें तें पाहावें. आणि ती।। रामराव काकांसही रवाना करितों. कसें कसें उत्तर येत जाईल तें सेवेसी श्रुत करीत जाईन. एक वेळ स्वामीच्या विचारें पुन्हां त्याजकडील अनुसंधान लागावें, तेणेंकडून सेवकाची सेवा रुजू व्हावी, ही इच्छा आहे. परिपूर्ण करणार श्रीहरी आहे. हे विनंती.