पत्रांक ३५९
श्री १७१३ वैशाख वद्य १३
राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री हरी बल्लाळ स्वामी गोसावी यांसी:-
पोष्य माधवराव नारायण प्रधान नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष. तुम्हीं पत्र छ ५ साबानचें पाठावलें तें छ १३ मिनहूस प्रविष्ट जाहलें. व दुसरें पत्र छ १० साबानचें पाठवलें तें छ १८ मिनहूस पावोन लेखनाभिप्राय अवगत जाहला. नवाबाची भेटी प्रथम दिवशीं जाहलियावर पत्र आलें त्याचें उत्तर पेशजींच रवाना जालें आहे. नवाबाशीं मसलतीचीं बोलणीं ठरावांत येऊन, तुम्हीं कूच करून सरकारचे फौजेंत कर्नूळचे मुकामीं दाखल जाला व नवाबाची फौज सामील जाल्यावर पुढें जावयाचा इरादा होईल. इंग्रजानें बेंगरूळचा किल्ला छ १५ रजबीं घेतला म्हणून किन्विस लिहून आलें त्याजवरून लिहिलें तें कळलें. इंग्रज श्रीरंगपट्टणकडे जाणार, मार्ग दुर्घट. तथापि बातमी येतच आहे तशी लिहिन म्हणून लिहिलें तें कळलें. व दुसरे पत्रीं मजकूर कीं, नबाबाची फौज चाळीस कोसाचे अंतरानें इंग्रजांजवळ जाऊन पोंचली. दरम्यान टिपू आहे ह्मणून अवघड. सरकारची फौज दहा हजार पुढें पाठवायची त्याची तयारी केली. त्यास नवाबाची फौज गेली त्याच मार्गे रवाना करितों, म्हणोन लिहिलें तें कळलें, टिपूस व इंग्रजाचे फौजेस आठ कोसांचें अंतर होतें. त्या पक्षीं मुकाबले झालेच असतील. बातमी येत जाईल तशी वरचेवर लिहून पाठवित जाणें, जाणिजे. छ १ रमजान सुहुरसन इहिदे तिसैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें ? हे विनंती. पे।। छ २७ रमजान, मु।। नजीक श्रीरंगपटण.